Maharashtra Weather Update : राज्यात आज कुठं कुठं कोसळणार पाऊस?, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update : हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार गुरुवारीही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

Maharashtra Weather Update : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगला पाऊस झालेला नाही. काही भागातील शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या भागात पावसाचा यलो अलर्ट

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पूर्व विदर्भात पावसाची प्रतिक्षा कायम

मान्सूनच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. पण पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. पश्चिम विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, उपराजधानीसह पूर्व विदर्भातील अनेक जिल्हे कोरडेच राहीले आहेत. दरम्यान, हवामान विभागाकडून विदर्भातील सर्व जिल्ह्यांना रोज ‘येलो अलर्ट’ दिला जातो, मात्र पूर्व विदर्भात पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मात्र नागपूरसह पूर्व विदर्भात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या या अंदाजानंतर तरी पाऊस येईल का? याची शंका शेतकऱ्यांना यायला लागली आहेत.

 आणखी वाचा

27 जूनपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु, विरोधकांकडून राज्य सरकारला कोंडीत धरण्याचा प्रयत्न होणार

 

Share this article