
Maharashtra Weather Update : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीची चाहूल लागल्यानंतर आता राज्यातही थंडीची लाट येणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजपासून, तर मराठवाड्यातील काही भागांत उद्यापासून तापमानात झपाट्याने घसरण होण्याची शक्यता आहे. ईशान्येकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात गारठा वाढत असून मुंबईतही तापमानात घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार शनिवार ते सोमवार या कालावधीत जळगाव जिल्ह्यात थंडीची लाट जाणवेल. नाशिकमध्ये रविवार- सोमवार, तर धुळे व नंदुरबारमध्ये सोमवारी तापमान आणखी कमी होणार आहे. शुक्रवारी जळगावमध्ये राज्यातील सर्वात कमी किमान तापमान ९.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा तब्बल ५.८ अंशांनी कमी होते. नाशिकमध्ये १०.९ अंश, धुळे–नंदुरबारमध्येही लक्षणीय घट दिसून आली.
उत्तर महाराष्ट्रातील कमी तापमानाचा परिणाम उत्तर कोकणावरही जाणवू लागला आहे. डहाणूमध्ये तापमान सरासरीपेक्षा ४.४ अंशांनी खाली जाऊन १७.६ अंशांवर आले. मुंबईत सांताक्रूझमध्ये १८.४ अंश, तर कुलाब्यात २२.६ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले. सांताक्रूझचे तापमान सरासरीपेक्षा ३.२ अंशांनी कमी होते. हवामान विभागाने मुंबईत पुढील दोन–तीन दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली आहे.
ईशान्येकडील थंड वाऱ्यांचा परिणाम जरी रात्रीच्या तापमानावर दिसत असला, तरी दिवसाच्या कमाल तापमानात मोठा बदल दिसत नाही. रत्नागिरी येथे ३४.२ अंश, कुलाबा ३३.८ अंश, तर सांताक्रूझ ३३.३ अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवले गेले. जळगावात किमान तापमान १० अंशांखाली गेले असले तरी दिवसा ३० अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचतोय, अशी स्थिती आहे. सध्या कमाल तापमानात मोठ्या बदलाची चिन्हे नाहीत, अशी माहिती हवामान विभागाने दिली.