Maharashtra Weather Alert: भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांसाठी 8 ऑक्टोबरला यलो अलर्ट जारी केला. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही भागांत विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.
मुंबई: महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अस्मानी संकट ओढावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील 10 जिल्ह्यांना 8 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी केला असून, विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाचा धोका वर्तवण्यात आला आहे.
28
कोकणात मुसळधार पावसाची शक्यता
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबई शहर व उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासोबत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे.
38
पश्चिम महाराष्ट्रातही अलर्टची स्थिती
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागानुसार या भागात विजांसह वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाची स्थिती राहणार असून, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात पावसाचा धोका असला तरी अलर्ट नाही
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला नाही, मात्र विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
58
मराठवाड्यात पावसाची पुन्हा हजेरी
धाराशिव आणि लातूर या दोन जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने 8 ऑक्टोबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. इतर मराठवाडा जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून या भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
68
विदर्भातही यलो अलर्ट
पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांतही यलो अलर्ट देण्यात आला असून, जोरदार पावसासोबत विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. इतर विदर्भातील जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
78
तापमानात घट, चक्रीवादळाचा प्रभाव
मागील दोन ते तीन दिवसांत राज्यभरात कमाल तापमानात घट झाल्याचं दिसून आलं आहे. ‘शक्ती’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 10 ऑक्टोबरपर्यंत पावसाचं असं सक्रिय स्वरूप टिकून राहण्याची शक्यता आहे.