Maharashtra Weather Alert: हवामान खात्याने महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक भागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये रविवारी (२६ ऑक्टोबर) जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी एकूण २२ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
26
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर कोकणातही अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून संध्याकाळी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील आणि त्यासोबत पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
36
उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि अहमदनगर जिल्ह्यांतही ढगाळ वातावरण आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी २६ ऑक्टोबर रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यात सध्या पावसाची सक्रियता वाढली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. केवळ हिंगोली आणि नांदेड येथे तुलनेने कमी पावसाचा अंदाज आहे.
56
विदर्भातही पावसाची शक्यता
अकोला, अमरावती, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठीही हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
66
शेतीसाठी उपयुक्त, पण काही पिकांना धोका
नैऋत्य मान्सून माघारी गेल्यानंतरही राज्यात पोषक वातावरण तयार झाल्याने पाऊस सुरूच आहे. हा पाऊस रब्बी हंगामातील पेरणीसाठी फायदेशीर ठरणार असला, तरी कापूस आणि इतर काढणीस आलेल्या पिकांना नुकसान होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे.