Maharashtra Voter List 2026 : महाराष्ट्राच्या मतदार यादीत मोठा बदल; 2 कोटींहून अधिक नावे वगळली

Published : Aug 31, 2026, 07:35 PM IST
Maharashtra Voter List

सार

महाराष्ट्राची SIR अंतर्गत नवी प्रारुप मतदार यादी जारी करण्यात आली आहे. आधीच्या 9.78 कोटी रजिस्टर्ड मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांचा यादीत समावेश आहे. तब्बल 2.06 कोटी मतदारांची नावे प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत.

मुंबई : राज्यातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण 2026’ (Special Intensive Revision-SIR) अंतर्गत महाराष्ट्राची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या नव्या यादीतून तब्बल 2,6,88,487 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांनी आपले नाव नव्या यादीत आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्रात 9.78 कोटी मतदार

एसआयआर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यात एकूण 9,78,54,049 रजिस्टर्ड मतदार होते. मात्र, नव्याने जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच एकूण नोंदणीकृत मतदारांपैकी 78.86 टक्के मतदारांची नावे प्रारुप यादीत आहेत. तर 21.14 टक्के म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावे सध्याच्या प्रारुप यादीत समाविष्ट झालेली नाहीत. गणना प्रपत्र न मिळणे, मतदार गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणी यांसारख्या कारणांमुळे ही नावे समाविष्ट झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रारुप मतदार यादीत पुरुष आणि महिला मतदार किती?

नव्या प्रारुप मतदार यादीमध्ये 3,95,89,905 पुरुष मतदार आणि 3,75,72,570 महिला मतदारांचा समावेश आहे. याशिवाय 3,087 तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारुप मतदार यादीत आहे की नाही, याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

मतदार यादीत तुमचं नाव आहे का?

मतदारांनी आपले नाव नव्या प्रारुप मतदार यादीत आहे की नाही, हे निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासता येणार आहे. यासाठी CEO Maharashtra च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन 'प्रारुप मतदार यादी 2026’ हा पर्याय निवडून आपले नाव तपासून पाहा.

नाव वगळले असल्यास दावे-हरकती नोंदवता येणार

प्रारुप मतदार यादीतून नाव वगळले गेले असल्यास संबंधित नागरिकांना दावे आणि हरकती नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय नवीन मतदार म्हणून नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांनाही या कालावधीत अर्ज करता येणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नागरिक नवमतदार म्हणून पात्र ठरणार आहेत. दावे आणि हरकतींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

मतदान केंद्रांचीही पुनर्रचना

SIR प्रक्रियेदरम्यान राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यात 1,00,253 मतदान केंद्रे होती. त्यापैकी 431 केंद्रे कमी करण्यात आली आहेत. याशिवाय 394 नवीन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे आता राज्यात एकूण 1,00,216 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

1,403 मतदान केंद्रांचे स्थळ बदलले

मतदारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने 1,403 मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्यात आले आहे. ही केंद्रे तात्पुरत्या रचनेतून पक्क्या आणि सुरक्षित इमारतींमध्ये हलवण्यात आली आहेत.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपले नाव प्रारुप मतदार यादीत तसेच मतदान केंद्र तपासून घेणे महत्त्वाचे आहे. नाव वगळले असल्यास निर्धारित कालावधीत दावे किंवा हरकती नोंदवण्याची संधी मतदारांना मिळणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Ganeshotsav 2026 : पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ च्या आवाजावरून वाद; शेकडो नागरिकांचा बंदीची मागणी
Weather Update : राज्यात निम्म्याहून थोडाच जास्त पाऊस, पिकांवर परिणाम; कुठे-कसा असेल पाऊस? IMD अलर्ट