Ganeshotsav 2026 : पुण्यात गणेशोत्सवाआधी DJ च्या आवाजावरून वाद; शेकडो नागरिकांचा बंदीची मागणी

Published : Aug 31, 2026, 04:30 PM IST
Ganeshotsav 2026

सार

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि मोठ्या आवाजातील म्युझिकविरोधात शेकडो नागरिकांनी आंदोलन केले आहे. याशिवाय विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे.

मुंबई : देशभरात गणेशोत्सवाला १४ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. अशातच पुण्यात डीजे (DJ) आणि मोठ्या आवाजातील म्युझिकचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजातील डीजे सिस्टीमचा वापर करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी शेकडो नागरिकांनी गुडलक कॅफे चौक परिसरात आंदोलन केले. अतिवेगाने वाजणाऱ्या संगीतामुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचा दावा आंदोलकांनी केला.

डीजेच्या आवाजाविरोधात नागरिकांचे आंदोलन

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली. गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या आवाजातील संगीताचा त्रास वाढल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. काही नागरिक तर विसर्जन मिरवणुकांच्या काळातील आवाजापासून दूर राहण्यासाठी दोन-तीन दिवस पुण्याबाहेर जात असल्याचा दावाही करण्यात आला.

‘आमचा विरोध कोणत्याही धर्माला नाही’

आंदोलकांनी स्पष्ट केले की, त्यांचा विरोध कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा समाजाविरोधात नाही. त्यांचा आक्षेप केवळ मोठ्या आवाजातील म्युझिक आणि हाय पॉवरफुल डीजे सिस्टीमच्या वापराबाबत आहे. शहरातील विविध सणांमध्ये मोठ्या आवाजाची समस्या दिसून येते. मात्र गणेशोत्सवातील मोठ्या मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांमुळे हा मुद्दा सध्या अधिक चर्चेत आला आहे.

नागरिकांनी विशेषतः गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे सिस्टीमवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी केली आहे. मोठ्या आवाजातील म्युझिकमुळे परिसरातील नागरिकांना होणारा त्रास आणि आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेऊन प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

काही गणेश मंडळांचा विरोध

दरम्यान, काही गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी मात्र सरसकट डीजे बंदीच्या मागणीला विरोध केला आहे. गणेश मंडळांनाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप काही प्रतिनिधींनी केला. शहरातील इतर पर्यावरणीय समस्यांकडेही समान गांभीर्याने पाहिले जावे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

काही मंडळांनी आधीच आवाज कमी करण्यासाठी उपाययोजना केल्याचा दावा केला आहे. साउंड सिस्टीममध्ये प्रेशर मिड आणि प्लाझ्मासारख्या उपकरणांचा वापर न करण्याचा निर्णय घेतल्याचे एका मंडळाच्या प्रतिनिधीने सांगितले. त्यामुळे आवाजाची तीव्रता कमी करण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.

प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे मंडळांचे आश्वासन

गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची तयारी दर्शवली आहे. उत्सवाच्या काळात प्रशासनाला सहकार्य करून निर्धारित नियमांचे पालन केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव जवळ येत असताना पुण्यात डीजे बंदीची मागणी करणारे नागरिक आणि सरसकट बंदीला विरोध करणारी गणेश मंडळे यांची भूमिका काय आहे हे समोर आले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Sanjay Raut: संजय राऊतांचा गंभीर आरोप, डीसीपींनी गणपती मंडळाला दिली धमकी
Gondhal Oscar Entry: 'गोंधळ'ची ऑस्करवारी! दिग्दर्शक संतोष दावखर म्हणाले, ही मोठी जबाबदारी