Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : भाजपकडून 30 नावांची यादी दिल्लीकडे; नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Published : Apr 24, 2026, 08:26 AM IST
BJP FLAG

सार

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेसाठी 9 जागांची निवडणूक आणि 1 पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. भाजपने 30 संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवली असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. काही विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 साठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पक्षाने तब्बल 30 इच्छुकांची यादी दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली असून, या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा स्पष्ट संकेत दिला आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर, 13 मे रोजी संपणार मुदत

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या नऊ सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. याशिवाय, डॉ. प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक देखील होणार आहे. अधिसूचना 23 एप्रिल रोजी जारी करण्यात आली असून, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 2 मे रोजी छाननी होणार असून, 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असेल.

भाजपची रणनीती: नव्या चेहऱ्यांना संधी

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत या निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. संघटनात्मक काम करणाऱ्या आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावर भर देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार आणि अमित साटम यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही रणनीती ठरवण्यात आली.

भाजपकडून चर्चेत असलेली प्रमुख नावे

भाजपने पाठवलेल्या यादीत अनेक दिग्गज आणि नवोदितांची नावे आहेत. त्यामध्ये माधवी नाईक, डॉ. उपेंद्र कोठेकर, मनोज कोटक, केशव उपाध्ये, रवी अनासपुरे, राजेश पांडे, दयाशंकर तिवारी, राम सातपुते, रणजितसिंह निंबाळकर, संजय काका पाटील, विवेक कोल्हे, जगदीश मुळीक, प्रमोद जठार, संजय केणेकर, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे आणि संदीप जोशी यांचा समावेश आहे. या नावांवर अंतिम निर्णय दिल्लीतील नेतृत्व घेणार आहे.

पोटनिवडणुकीत प्रज्ञा सातव यांचे नाव आघाडीवर

पोटनिवडणुकीसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या कार्यकाळाची मुदत मूळतः 2030 पर्यंत होती, मात्र राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे.

रिक्त होणाऱ्या जागांमुळे वाढली राजकीय चुरस

विधान परिषदेत संजय केणेकर, नीलम गोऱ्हे, उद्धव ठाकरे, संदीप जोशी, दादाराव केचे, अमोल मिटकरी, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड आणि शशिकांत शिंदे यांचा कार्यकाळ संपत असल्याने या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.

निवडणूक कार्यक्रम (महत्त्वाच्या तारखा)

  • अधिसूचना: 23 एप्रिल 2026
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: 30 एप्रिल 2026
  • छाननी: 2 मे 2026
  • अर्ज मागे घेण्याची तारीख: 4 मे 2026

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 12 मे ला मतदान; महायुतीचे 8 जागांवर वर्चस्व, मविआसमोर मोठे आव्हान
TCS Nashik Case : धक्कादायक खुलासा! ऑफिसचे पासवर्ड चक्क 'अश्लील' भाषेत होते, पीडितेचा आरोप