Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : 12 मे ला मतदान; महायुतीचे 8 जागांवर वर्चस्व, मविआसमोर मोठे आव्हान

Published : Apr 23, 2026, 05:40 PM IST
Vidhan Bhavan Maharashtra

सार

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून, सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचे 8 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता असून, उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान होणार असून, सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. एक उमेदवार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असल्याने, विधानसभेतील पक्षीय बलाबल या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

महायुतीचे स्पष्ट वर्चस्व

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भाजपकडे 131, शिवसेना (शिंदे गट) 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 40 आमदार आहेत. या एकत्रित ताकदीच्या जोरावर महायुतीचे 8 उमेदवार सहज विजयी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये भाजपचे 5, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषदेत महायुतीचे वर्चस्व अधिक मजबूत होण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीसमोर मर्यादित संधी

दुसरीकडे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडे मिळून 46 आमदार आहेत. त्यामुळे या आघाडीला केवळ एकच जागा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ही जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाने आधीच जाहीर केले आहे की, उद्धव ठाकरे विधान परिषदेसाठी इच्छुक असल्यास त्यांना पाठिंबा दिला जाईल. त्यामुळे ठाकरे स्वतः निवडणूक लढवणार की इतर कुणाला संधी देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

जळगावमधील राजकीय हालचालींना वेग

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विधान परिषदेसाठी निवडणुका होत असून, गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या 17 जागांपैकी काहींसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगावमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून नंदूकुमार अडवाणी, नंदकिशोर महाजन आणि अमोल शिंदे यांची नावे पुढे आली आहेत, तर शिवसेना गटाकडून प्रतापराव पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.

जागावाटपाचा तिढा; ‘मैत्रीपूर्ण’ लढतीची शक्यता

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर दोन्ही पक्षांत एकमत झाले, तर महायुतीकडून एकत्रित उमेदवार दिला जाईल. मात्र, तिढा कायम राहिल्यास ‘मैत्रीपूर्ण’ पण थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत स्थानिक पातळीवरही राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

TCS Nashik Case : धक्कादायक खुलासा! ऑफिसचे पासवर्ड चक्क 'अश्लील' भाषेत होते, पीडितेचा आरोप
Mumbai-Goa Highway : काम अपूर्ण असतानाच टोल वसुलीचा घाट; मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल पुन्हा चर्चेत