
Vidhan Parishad Election 2026 : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीची रंगत चढण्याची चिन्हे दिसत आहेत. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून, 13 मे रोजी विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी उमेदवारीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार करता महायुतीला स्पष्ट आघाडी मिळताना दिसत आहे. भाजप (131), शिवसेना शिंदे गट (57) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (40) यांच्या एकत्रित ताकदीमुळे महायुतीचे 8 उमेदवार सहज विजयी होऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांना केवळ एकच जागा निश्चित मिळण्याची शक्यता आहे.
राजकीय समीकरणांनुसार भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या अतिरिक्त 13 मतांमुळे जर महायुतीने अतिरिक्त उमेदवार दिला, तर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
भाजपमध्ये विशेषतः उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत लॉबिंग आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे.
13 मे रोजी विधान परिषदेतील 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे.
भाजपकडून केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांसारखी नावे चर्चेत आहेत. तसेच विद्यमान आमदारांपैकी रणजितसिंह मोहिते-पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर यांच्या पुनर्नियुक्तीबाबतही चर्चा सुरू आहे. पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार की विद्यमानांना संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक असतो. महायुतीच्या ताकदीमुळे बहुतेक जागांवर त्यांचा विजय निश्चित मानला जात असला, तरी अतिरिक्त उमेदवारीमुळे निवडणूक रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.