
Maharashtra Schools : महाराष्ट्रातील महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्यातील सर्व शाळांमध्ये आता ‘वंदे मातरम्’ संपूर्ण स्वरूपात गाणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रभक्ती आणि संस्कारभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असून दिवंगत बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या ‘वंदे मातरम्’ गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत शाळांमध्ये फक्त पहिले दोन श्लोक गायले जात होते; मात्र आता संपूर्ण गीत गावे लागेल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
सरकारच्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी या पवित्र गीताच्या रचनेला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने राज्यातील सर्व शाळांनी ‘वंदे मातरम्’ पूर्ण गीत सादर करावे, तसेच विद्यार्थ्यांना या गीताच्या ऐतिहासिक महत्त्वाबद्दल आणि ते राष्ट्रभावनेशी कसे जोडलेले आहे याबाबत माहिती द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. याच अनुषंगाने शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’च्या इतिहासावर आधारित विशेष प्रदर्शन आयोजित करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांचा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाशी असलेला भावनिक संबंध अधिक दृढ होईल.
या उपक्रमाची अंमलबजावणी ३१ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सर्व शाळांमध्ये करण्यात येणार आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना संपूर्ण गीत शिकवले जाईल, गाणे सादर केले जाईल आणि संबंधित प्रदर्शन लावले जाईल. शिक्षण विभागाला याबाबतचे संदर्भ पत्र देण्यात आले असून सर्व शैक्षणिक संस्थांनी आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
दरम्यान, या निर्णयावर काही राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे नेता असदुद्दीन ओवैसी यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीही काही पक्षांनी संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गाण्यास विरोध दर्शविला असून फक्त पहिले दोन श्लोक गाण्यास ते सहमत होते. त्यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेला उधाण येण्याची चिन्हे आहेत.