ऐतिहासिक निर्णय! ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची पहिली बैठक, फडणवीस सरकारचे ११ महत्त्वाचे निर्णय

Published : May 06, 2025, 06:55 PM ISTUpdated : May 06, 2025, 07:08 PM IST
maharashtra cabinet meeting

सार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ११ महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये चित्रपट निर्मिती, आदिशक्ती अभियान, यशवंत विद्यार्थी योजना, वसतिगृह योजना आदी योजनांचा समावेश आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आज चौंडी येथे राज्याच्या मंत्रिमंडळाची अभूतपूर्व बैठक पार पडली. इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मंत्रिमंडळाने ग्रामीण भागात एकत्र येत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक बैठकीत ११ मोठे निर्णय घेण्यात आले, जे विविध सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांना नवी दिशा देणारे आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील प्रमुख निर्णय

१. अहिल्यादेवींच्या जीवनावरील चित्रपट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर आधारित एक भव्य, व्यावसायिक आणि बहुभाषिक चित्रपट साकारला जाणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ या प्रकल्पाची अंमलबजावणी करेल. यासाठी लागणारा निधी राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून दिला जाईल.

२. आदिशक्ती अभियान आणि पुरस्कार

राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन महिलांचा गौरव केला जाईल. हे अभियान महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक समस्यांवर समाजात जागरूकता निर्माण करेल. कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करणे, शिक्षण वाढवणे, बालविवाह रोखणे, हिंसाचारमुक्त समाज निर्माण करणे आणि महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देण्यात येतील आणि यासाठी १०.५० कोटी रुपये खर्च केले जातील.

३. ‘यशवंत विद्यार्थी योजना’

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यासाठी असलेल्या योजनेला आता ‘राजे यशवंतराव होळकर यांचे नाव’ देण्यात आले आहे. ‘यशवंत विद्यार्थी योजना’ अंतर्गत दरवर्षी १०,००० विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल. आतापर्यंत यासाठी २८८.९२ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. राजे यशवंतराव होळकर यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याचा हा गौरव आहे.

४. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’

धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृहे बांधली जाणार आहेत. या योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना’ असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक वसतिगृहात १०० मुलांसाठी आणि १०० मुलींसाठी निवास व्यवस्था असेल. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे ही वसतिगृहे उभारली जातील. नाशिकमध्ये काम सुरू असून, पुणे आणि नागपूरमध्ये लवकरच सुरू होईल.

५. ऐतिहासिक जलस्त्रोतांचे जतन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या घाट, विहिरी आणि पाणीवाटप प्रणालीचे सर्वेक्षण करून त्यांच्या जतनासाठी विशेष योजना राबविली जाईल. राज्यात असलेले ३ ऐतिहासिक तलाव, १९ विहिरी, ६ घाट आणि ६ कुंड यांची दुरुस्ती, गाळ काढणे, पुनरुज्जीवन आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी ७५ कोटी रुपये खर्च केले जातील.

६. अहिल्यानगरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ४३० खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन केले जाईल. या महाविद्यालयाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय’ असे नाव असेल. यासाठी ४८५.०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा आणि मनुष्यबळ यासाठी वापरले जाईल.

७. मंदिर विकास आराखडे

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांच्या मंदिर पुनर्निर्माण कार्याला आदरांजली म्हणून ५५०३.६९ कोटी रुपयांचे भव्य मंदिर विकास आराखडे तयार करण्यात आले आहेत. यात चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतिस्थळाचे जतन व संवर्धन (६८१.३२ कोटी), अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार (१४७.८१ कोटी), श्री क्षेत्र तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा (१८६५ कोटी), श्री क्षेत्र ज्योतीबा मंदिर विकास आराखडा (२५९.५९ कोटी), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर विकास आराखडा (२७५ कोटी), श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर विकास आराखडा (१४४५.९७ कोटी) आणि श्री क्षेत्र माहूरगड विकास आराखडा (८२९ कोटी) यांचा समावेश आहे.

८. अहिल्यानगरमध्ये महिलांसाठी आयटीआय

अहिल्यानगर येथे खास मुली आणि महिलांसाठी नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) सुरू करण्यात येणार आहे.

९. राहुरीत दिवाणी न्यायालय

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

१०. मिशन महाग्रामचा विस्तार

ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन (व्हीएसटीएफ) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन महाग्राम’ या कार्यक्रमाचा कालावधी २०२२-२५ वरून २०२८ पर्यंत वाढविण्यात आला आहे.

११. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण अध्यादेश-२०२५ जारी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

एकंदरीत, फडणवीस सरकारने घेतलेले हे निर्णय ऐतिहासिक महत्त्वाचे असून, ते ग्रामीण भागाच्या विकासाला आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

आजपासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी 4 मोठे मोर्चे, 4 आत्महत्यांचे गंभीर इशारे, 15 धरणे आंदोलन, 9 उपोषणे
Winter Session Nagpur 2025 : हिवाळी अधिवेशनात IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची BJP करणार मागणी, ‘स्मार्ट सिटी’ प्रकरण पुन्हा ऐरणीवर