अण्णाभाऊ साठेंच्या कन्या शांताबाई साठे यांचे निधन

Published : May 06, 2025, 05:36 PM IST
shantabai sathe new

सार

कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचं रविवारी, वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी आपलं आयुष्य कामगारांच्या उन्नतीसाठी समर्पित केलं आणि अण्णाभाऊंच्या विचारांची ज्योत जिवंत ठेवली.

मुंबई: लोकशाहीर आणि कामगारांच्या संघर्षाचे ज्वलंत प्रतीक असलेल्या कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचं रविवारी निधन झालं. वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्या अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात लहान बहीण शकुंतला, भाचे-भाच्या आणि नातवंडांचा परिवार आहे. त्यांच्या निधनाने एक सांस्कृतिक आणि वैचारिक पर्व संपुष्टात आलं आहे.

संघर्षमय आयुष्याचा शांत लढा

शांताबाई साठे या अण्णाभाऊ साठे यांच्या द्वितीय पत्नी कॉ. जयवंताबाई दोडके यांची कन्या होत्या. बालवयातच कम्युनिस्ट पक्षाच्या 'बाल संघात' सहभागी होत त्यांनी सामाजिक संघर्षात पहिले पाऊल टाकले. कॉ. डांगे, कॉ. आर. बी. मोरे यांच्या मुलांबरोबर त्यांनी अनेक सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेतला. "लाल बावटा" कला पथकात त्यांनी शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकरांसोबत काम केलं. या कार्याच्या दरम्यान त्यांचं योगदान केवळ सहकलाकार म्हणून नव्हे, तर कार्यकर्ती आणि संघटक म्हणूनही लक्षणीय ठरलं.

तुरुंगवास आणि आर्थिक संघर्ष

1949 मध्ये कम्युनिस्ट पक्षावर आलेल्या दडपशाहीदरम्यान शांताबाईंनी काही महिन्यांचा तुरुंगवासही भोगला. घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने वयाच्या सोळाव्या वर्षीच औषध कंपनीत नोकरी स्वीकारावी लागली. आईसोबत कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्या कामगार संघटनांमध्ये सक्रीय राहिल्या.

त्यांचा पगार अतिशय कमी असतानाही त्या दर महिन्याला अण्णाभाऊंच्या पहिल्या पत्नी कोंडाबाई आणि त्यांच्या मुलगा मधुकर यांना पैसे पाठवत असत. कौटुंबिक नातेसंबंधांतील ही माणुसकीची साखळी त्यांनी शेवटपर्यंत जपली.

साहित्य व सांस्कृतिक वारशाच्या पहिल्या साक्षीदार

अण्णाभाऊंच्या पहिल्या कथा, कादंबऱ्या, लोकनाट्य याच्या त्या पहिल्या वाचक व समीक्षक होत्या. त्यांनी "काई चालं न गा", "अकलेची गोष्ट" यासारख्या लोकनाट्यांतून अभिनय, दिग्दर्शन व साहाय्य केलं. गोरेगावच्या औद्योगिक वसाहतीत मिळालेलं भाड्याचं घर हे कॉ. अमर शेखांच्या प्रयत्नांमुळे शक्य झालं होतं, हे त्यांचे सहकाऱ्यांशी असलेले स्नेहसंबंध स्पष्ट करतं.

शेवटपर्यंत स्वाभिमानी

उतारवयात शासकीय पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, तरीही त्यांनी आपला स्वाभिमान आणि विचारांची निष्ठा कायम ठेवली. त्यांचं संपूर्ण आयुष्य हे कामगार, शोषित व कष्टकरी वर्गाच्या उन्नतीसाठी समर्पित होतं. "अण्णाभाऊंच्या कन्येला समाजाकडून अपेक्षित मान-सन्मान मिळाला नाही, ही खंत आमची आहे," असं लोक सांस्कृतिक मंचचे सुबोध मोरे यांनी हळहळ व्यक्त करताना सांगितलं.

अंत्यसंस्कार आणि अखेरचा निरोप

सोमवारी सायंकाळी, शांताबाईंच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलतनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक लढ्याचे एक अखंड पर्व संपुष्टात आले आहे.

एक प्रेरणादायी ठसा

कॉ. शांताबाई साठे यांनी स्वतःच्या आयुष्याच्या माध्यमातून अण्णाभाऊंच्या विचारांची आणि लढ्याची ज्योत जिवंत ठेवली. त्यांचा प्रवास हा आजच्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे. स्वाभिमानाने जगण्याची, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आणि आपले विचार कृतीत उतरवण्याची!

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

SSC–HSC Exam 2026: दहावी–बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट, डिजिटल मार्कशीटसाठी APAAR ID नोंदणी बंधनकारक
कौटुंबिक वाद टाळून जमीन-मालमत्तेची वाटणी कशी करावी? जाणून घ्या कायदेशीर हक्क आणि सोपे उपाय