
Maharashtra Rain Alert : मुंबईसह कोकणात हलक्या सरींची नोंद झाली असली, तरी उर्वरित महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा बसत आहे. ब्रह्मपुरी येथे २४ तासांत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून, तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मान्सूननं राज्यातून निरोप घेतला असला तरी हवामान अजूनही अस्थिर आहे. *दक्षिणेकडे तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे पुन्हा एकदा पावसाचे वातावरण तयार झाले आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पुढील सात दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राला थेट धोका नसला तरी हवामानात मोठे बदल दिसतील. हवेत आर्द्रता वाढल्याने उकाडा आणि दमट वातावरण अधिक तीव्र होईल.
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी सांगितले की, पुढील ४८ तास अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. कमी दाबाचे क्षेत्र लक्षद्वीपकडून पश्चिम बंगालच्या दिशेने सरकणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल. १९ ऑक्टोबर रोजी या भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
२० आणि २१ ऑक्टोबर रोजी मराठवाड्याचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या दमट वाऱ्यांमुळे पाऊस आणि उष्णतेचे दुहेरी संकट राहणार आहे. २२ आणि २३ ऑक्टोबरला पाऊस झाल्यानंतर पुन्हा एकदा उकाडा वाढेल. त्यानंतर ऑक्टोबर हिटचा तडाखा अधिक जाणवेल, मात्र २३ ऑक्टोबरनंतर हवेत थंडीची चाहूल लागण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
राज्यातील बहुतेक भागांत दिवसा तापमान वाढत आहे, तर रात्री किंचित गारवा जाणवत आहे. ला नीना हवामान स्थितीमुळे यंदाची हिवाळी थंडी नेहमीपेक्षा जास्त तीव्र असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दिवाळीनंतर थंडीत हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे.