Maharashtra Rain Alert: अरबी समुद्रातील 'शक्ती' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सोमवारपासून पुन्हा पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला असून, अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.
सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार एन्ट्री होणार
मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ चक्रीवादळाचा मोठा परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर दिसू लागला आहे. राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी, आता सोमवारपासून पुन्हा एकदा पावसाची जोरदार एन्ट्री होणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच विदर्भातील पाच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
27
कोकणात पुन्हा पावसाचा जोर
कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर परिसरात मंगळवारी पावसाची तीव्रता वाढू शकते.
मुंबई आणि उपनगरांमध्ये कमाल तापमान ३० अंश तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहणार असून, पावसाचे हलके सरी कोसळू शकतात.
37
पश्चिम महाराष्ट्रात पावसाची विश्रांती, पण...
पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यांत तापमानात वाढ जाणवतेय. सध्या पावसाने उघडीप घेतली असली तरी पुढील दोन दिवसांनंतर हवामानात पुन्हा मोठे बदल होण्याचा अंदाज आहे. ८ ऑक्टोबरपासून पावसाची शक्यता वाढणार आहे.
धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोमवारी हलक्याशा पावसासह गडगडाटाची शक्यता असून, पुढील २४ तासांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
57
मराठवाड्याला पुन्हा पावसाचा फटका?
मराठवाड्यातून पावसाने काही प्रमाणात काढता पाय घेतला होता. मात्र रविवारी धाराशिव जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस झाला. सध्या कोणत्याही जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी, सर्व जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. ७ ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
67
पूर्व विदर्भात यलो अलर्ट
नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यांत सोमवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपासून या भागांतील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. पण, सध्या चक्रीवादळाचा परिणाम स्पष्टपणे जाणवतो आहे.
77
पुढे काय?
९ ऑक्टोबरनंतर राज्यात हवामानात सुधारणा होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण हटून स्वच्छ आकाश दिसू लागेल. मात्र, यासोबतच तापमानात वाढ होऊन राज्यात ‘ऑक्टोबर हिट’ची तीव्रता जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.