Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात दिवाळीनंतरही अवकाळी पावसाने कहर केला असून शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. हवामान विभागानुसार सायक्लोनिक सर्क्युलेशन आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे हा पाऊस पडत आहे. 5-6 नोव्हेंबरला यलो अलर्ट दिला आहे.
दिवाळी संपून तुळशीचं लग्न झालं तरी राज्यात अजूनही पावसाचं सत्र सुरूच आहे. नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात अवकाळी पावसाने ग्रामीण भागात हाहाकार माजवला आहे. अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे कापणीच्या तोंडावर आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. सतत ढगाळ वातावरण आणि वाढलेली दमट उकाड्याची लाट यामुळे थंडी लांबणीवर गेली आहे. हवामान विभागानुसार हा अवकाळी पाऊस किमान 10 नोव्हेंबरपर्यंत थैमान घालणार असून त्यानंतर पावसाचा जोर ओसरू लागेल.
25
अवकाळी पावसामागचं कारण – IMD ची माहिती
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे उत्तर-पश्चिम मार्गाने येणारे सायक्लोनिक सर्क्युलेशन यामुळे महाराष्ट्रात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. 4 आणि 5 नोव्हेंबरला या प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. कोकण-गोवा किनारपट्टीवर आधीच विजांसह सरी सुरू आहेत. त्याचबरोबर म्यानमारजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून त्याचा परिणाम कमी किंवा जास्त प्रमाणात भारतावर जाणवू शकतो. याशिवाय गुजरात किनारपट्टीजवळही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाला आणखी चालना मिळाली आहे.
35
48 तासांचा अंदाज
हवामान खात्यानुसार आज राज्यात हलक्या सरींची शक्यता असून शेजारच्या राज्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार आहे. 5 आणि 6 नोव्हेंबरला पुन्हा महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहतील असा इशारा दिला आहे.
कोकणात मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये हलक्या सरी पडतील, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम पाऊस अपेक्षित आहे. मुंबईत तापमान 32/24 अंशांदरम्यान राहील. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, घाटमाथ्यावरही विजांसह हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात तापमान सुमारे 29/21 अंश राहण्याची शक्यता आहे.
55
10 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रित कुमार यांच्या माहितीनुसार 5 व 6 नोव्हेंबरला कोकण, मध्य व पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 नोव्हेंबरलाही पावसाची शक्यता असून 8 ते 10 नोव्हेंबरदरम्यान हलक्या सरी कायम राहतील. दिवसाढवळ्या उकाडा आणि रात्री पावसाच्या सरी यामुळे वातावरणात अजब बदल दिसत असून थंडी सध्या पूर्णपणे लांबली आहे.