Maharashtra Rain Alert: राज्यात ९ ऑक्टोबर रोजी पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटामुळे काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला.
मुंबई: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच राज्यात अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहे. येत्या 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुन्हा पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा अनुभवही येऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
27
कोकणात हवामानाचा गदारोळ
मुंबईसह पालघर, ठाणे परिसरात ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून, हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जारी केला आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रात ढगांचा डोंगर
पुणे आणि त्याच्या घाटमाथा भागात ढगगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा आणि घाटमाथा भागात हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाची शक्यता असून या ठिकाणी देखील यलो अलर्ट आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. पावसाचा जोर कमी असल्यामुळे दिवसाच्या दुसऱ्या भागात वातावरण अधिक दमट होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शविली आहे.
57
उत्तर महाराष्ट्रात थोडा थंडावा
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहून हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. तापमानात किंचित घट जाणवण्याची शक्यता आहे.
67
विदर्भात कोरडं हवामान
अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत कोरडं वातावरण राहील. येथे पावसाची शक्यता नाही. नागपूरमधील तापमान 23 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
77
हवामान विभागाची महत्त्वाची सूचना
यलो अलर्ट असलेल्या भागातील नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्यावर थांबणे टाळावे, झाडाखाली किंवा मोबाइल वापरणे सुरक्षित नाही. सुरक्षिततेसाठी या खबरदाऱ्या नक्की पाळा.