केंद्र सरकारने मराठा,ओबीसी आरक्षणाबाबत बघ्याची भूमिका न घेता पुढाकार घेऊन सोल्यूशन काढावे : शरद पवार

शरद पवार यांनी गुरुवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाबाबत भाष्य केले. त्यांनी या प्रश्नात केंद्र सरकारने लक्ष घालण्याची गरज असल्याचे म्हटले.

 

बारामती : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केली आहे. केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले. ते गुरुवारी बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार यांना मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाने धरलेला जोर आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, या सगळ्याचं सोल्यूशन एकच आहे. ते म्हणजे केंद्र सरकारने याचा खुलासा घेतला पाहिजे. काही ठिकाणी कायद्यात बदल करावा लागेल. काही ठिकाणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या धोरणात बदल करावे लागतील, असे शरद पवार यांनी म्हटले.

शरद पवार यांनी आरक्षणासंदर्भात ही भूमिका मांडून चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात ढकलला आहे. त्यामुळे आता यावर केंद्रातील भाजपचे नेते काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल. तसेच राज्यातील महायुतीचे नेतेही शरद पवार यांनी घेतलेल्या या भूमिकेचा प्रतिवाद कशाप्रकारे करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

आणखी वाचा :

नितीश कुमारांना पाटणा उच्च न्यायालयाचा मोठा झटका, 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द

Share this article