Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस अपेक्षित असून, विदर्भात हवामान कोरडे राहील.
मुंबई: नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात पुन्हा पावसाची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही भागांत तापमानात घट होऊन गारवा जाणवेल, असंही सांगितलं जात आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभरात हवामानात बदलते वातावरण दिसत असून, ६ नोव्हेंबर रोजीही हीच स्थिती कायम राहणार आहे.
27
कोकणात पुन्हा पावसाची सर
कोकण विभागात पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मुंबईतील तापमानात किंचित घट अपेक्षित असून, कमाल तापमान ३४ अंश आणि किमान २२ अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
37
पश्चिम महाराष्ट्रातही आकाश ढगाळ
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून, पुण्यातील कमाल तापमान ३० अंश आणि किमान २० अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान ३० अंश आणि किमान २० अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.
57
नाशिक विभागात थंडीचा गारठा, हलका पाऊस शक्य
नाशिक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तेथील कमाल तापमान २९ अंश आणि किमान १७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहील.
67
विदर्भात कोरडे वातावरण कायम
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. नागपूरचे कमाल तापमान ३१ अंश आणि किमान १९ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात विविध भागांत सध्या संमिश्र हवामानाची स्थिती असून, रात्री आणि सकाळच्या सुमारास थंडावा वाढण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना बदलत्या वातावरणाचा विचार करून पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलं आहे.