भुशी डॅम दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 3, 2024 2:22 PM IST

लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तर भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत केली.

पावसाळी सहलीसाठी लोणावळ्यातील भुशी धरण परिसरात गेलेल्या कुटुंबासोबत मोठी दुर्घटना घडली आहे. भुशी डॅम परिसरातील धबधब्यामध्ये पुण्याच्या हडपसरमधील अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. भुशी धरणाच्या मागील धबधब्यात पाच जणांचे अख्खं कुटुंब वाहून गेले असून यामध्ये लहान मुले आणि महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. भुशी धरण दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या पीडितांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

भविष्यात पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीच्या माध्यमातून निधी

पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून भुशी धरण दुर्घटनेतील पीडितांच्या कुटुंबियांना मदत देणे आणि धोकादायक स्थळांवर सुरक्षाव्यवस्था करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भुशी धरण परिसरातील दुर्घटना दुर्दैवी असून अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. या निधीतून संभाव्य धोकायदायक ठिकाणी प्रतिबंधात्मक माहिती फलक लावणे, कुंपण घालणे, सुरक्षीततेसाठी जाळ्या लावणे आदी कामे करण्यात येतील.

अपरिचित धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करणार

पर्यटकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी माहितीफलक लावणे, सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे आदी कार्यवाही आधीपासूनच करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर दुर्गम धोकादायक स्थळीही सुरक्षिततेबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आणि अपरिचित धोकादायक ठिकाणी जाण्यापासून नागरिकांना रोखण्यासाठी, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक फलक लावण्यासह आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले.

Share this article