Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रात भाजपला जालन्यात मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंच्या गटाची बाजी, जाणून घ्या राज्यातील VVIP उमेदवारांचे निकाल

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या निकालाचे कौल आतापर्यंत पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. यामध्ये जालन्यात भाजपाला मोठा धक्का बसला असून बारामती येथे शरद पवारांना आपला गड राखण्यास विजय मिळाला आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील निकालाबद्दल सविस्तर….

vivek panmand | Published : Jun 3, 2024 4:35 AM IST / Updated: Jun 04 2024, 11:46 PM IST

Maharashtra Lok Sabha Elections Results 2024 : महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या ४८ जागा असून येथे दिग्गज नेत्यांचे भवितव्य पणाला लागले  होते. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, सुप्रिया सुळे, नितीन गडकरी, रावसाहेब दानवे अशा दिग्गज उमेदवारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा जागांवर काट्याची लढत दिसून आली. मतदानाच्या आधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्येही भाजपाला महाराष्ट्रात धक्का बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. जाणून घेऊया महाराष्ट्रातील लोकसभेच्या निकालाबद्दल सविस्तर…

१. बारामती लोकसभा निवडणूक 2024 : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
महाराष्ट्र मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या गटातील सुनेत्रा पवार लढत होत्या. यामध्ये शरद पवारांना आपला गड राखण्यास मोठे यश मिळाले असून येथून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत. तर सुनेत्रा पवारांचा पराभूत झाला आहे. 

२. कोल्हापूर लोकसभा निवडणूक २०२४: छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस पार्टी)
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. येथून काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून यांना तिकीट देण्यात आले होते. यानुसार छत्रपती शाहू महाराज यांचा विजय झाला असून त्यांनी शिवसेनेचे सदाशिवराव मंडलिक यांचा पराभव केला आहे.

३. रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४: नारायण राणे (भाजपा)
सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह होती. कोकणातून भाजपाकडून नारायण राणे  यांना तिकीट दिले होते. याच जागेवरुन नारायण राणे यांनी विजय मिळवला होता. नारायण राणे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे विनायक राऊत निवडणुकीच्या रिंगणात होते. तर विनायक राऊत यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग येथून पराभव झाला आहे.

४. दिंडोरी लोकसभा निवडणूक २०२४: डॉ. भारती पवार (भाजपा)
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. भारती पवार  यांचा पराभव  झाला आहे. त्या केंद्रामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भास्कर मुरलीधर भागरे यांचा विजय झाला आहे.

५. सातारा लोकसभा निवडणूक २०२४: उदयनराजे भोसले (भाजपा)
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांचा विजय झाला आहे. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. तर सातारा येथून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. निवडणुकीच्या काळात शशिकांत शिंदे संचालक असलेल्या मुंबई बाजार समितीमधील घोटाळा बाहेर काढण्यात आला होता.

६. माढा लोकसभा निवडणूक २०२४: धैर्यशील मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या  विरोधात भाजपकडून रणजित सिंह निंबाळकर हे उभे होते. 

रणजित सिंह निंबाळकर हे याच मतदारसंघातून २०१९ मध्ये खासदार म्हणून निवडून आले होते. यावेळी मोहिते पाटलांनी बंड केल्यामुळे दोघांमधील लढत काट्याची झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष येथील निवडणुकीकडे लागून आहे.

७. नागपूर लोकसभा निवडणूक २०२४: नितीन गडकरी (भाजपा)
नितीन गडकरी यांनी नागपूर येथून विजयी झाले आहेत. नितीन गडकरींच्या विरोधात काँग्रेसकडून विकास ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. ते पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

वर्ष 2019 मध्ये नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून जिंकून आले होते. विकास ठाकरे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याने नितीन गडकरी यांनी गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला होता. 

८. चंद्रपूर लोकसभा निवडणूक २०२४: सुधीर मुनगंटीवार (भाजपा)
सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथून पराभूत झाले आहेत. त्यांची लढत प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवाराशी होती. चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर अखेर विजयी झाल्या आहेत. प्रतिभा धानोरकर यांचे पती बाळूभाऊ धानोरकर हे काँग्रेसकडून एकमेव काँग्रेसचे खासदार म्हणून २०१९ मध्ये निवडून आले होते.

सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसताना त्यांनी निवडणूक लढवली. भद्रावती - वरोरा प्रतिभा धानोरकर या निवडणूक लढवत असून त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात वातावरण निर्मिती केली होती.

९. सोलापूर लोकसभा निवडणूक २०२४: प्रणिती शिंदे (काँग्रेस)
प्रणिती शिंदे या काँग्रेसकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्या सोलापूर मध्य येथून आमदार म्हणून वर्ष 2019 मध्ये निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात राम सातपुते यांनी भाजपाकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा आता पराभव झाला आहे. 

राम सातपुते हे माळशिरस येथून आमदार होते. राम सातपुते यांच्यासाठी येथून नरेंद्र मोदी आणि प्रणिती शिंदे यांच्यासाठी राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या.

१०. उत्तर मुंबई लोकसभा निवडणूक २०२४: पियुष गोयल (भाजपा)
पियुष गोयल यांचा उत्तर मुंबई लोकसभा निवडणुकीत विजय झाला आहे. ते केंद्रात वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील उभे होते. 

भूषण पाटील हे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष पद सांभाळले आहे. पियुष गोयल आणि भूषण पाटील या दोघांना लोकसभा निवडणूक लढवायचा अनुभव नसून कोण निवडून येते हे ४ जुनलाच समजणार आहे.

११. कल्याण लोकसभा निवडणूक २०२४: श्रीकांत शिंदे (शिवसेना)
श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेच्या जागेवरुन विजयी झाले आहेत. श्रीकांत शिंदे वर्ष 2014 आणि वर्ष 2019 ला कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वैशाली दरेकर - राणे यांना तिकीट जाहीर केले होते.

उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात कमजोर उमेदवार दिला असे म्हटले जात होते. वैशाली दरेकर राणे या कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या राहिलेल्या आहेत. 

१२.शिरूर लोकसभा निवडणूक २०२४: डॉ. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर लोकसभा जागेवरुन विजयी झाले आहेत.  अमोल कोल्हे वर्ष 2019 मध्ये याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवाजीराव आढळराव यांच्याशी झाली होती. 

अमोल कोल्हे यांचे तिकीट आधीच जाहीर केलेले असल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. शिवाजीराव आढळराव यांनी अजित पवार गटात प्रवेश करून तिकीट मिळवले, त्यानंतर प्रचार सुरु केला. शरद पवार यांच्या सहानुभूतीचा फायदा डॉ. अमोल कोल्हे यांना मिळेल असं म्हटले जात होते.

१३. जालना लोकसभा निवडणूक २०२४ : रावसाहेब पाटील दानवे (भाजपा)
रावसाहेब पाटील दानवे यांचा जालन्यातून दारुण पराभव झाला आहे. ते केंद्रामध्ये रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. रावसाहेब दानवे हे पाच वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या विरोधात कल्याण काळे हे निवडणुकीला उभे होते त्यांचा जालन्यात विजय झाला आहे.

१४. अकोला लोकसभा निवडणूक २०२४: प्रकाश आंबेडकर (वंचित बहुजन आघाडी)
प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. ते दोन वेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेतून असे तीन वेळा खासदार राहिले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष म्हणून प्रकाश आंबेडकर काम पाहतात. अकोल्यातून महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. याशिवाय काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील यांनी देखील निवडणूक लढवली होती.

१५.अमरावती लोकसभा निवडणूक २०२४: नवनीत राणा (भाजपा)
नवनीत राणा या अमरावती लोकसभा लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. नवनीत राणा वर्ष 2019 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवनीत राणा यांना पाठींबा दिला होता, पण निवडणूक झाल्यानंतर त्यांनी भाजपला अनुकूल भूमिका घेतली. नवनीत राणा यांच्या विरोधात काँग्रेसने बळवंत वानखेडे आणि बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाने दिनेश बुब हे निवडणुकीच्या मैदानात होते.

१६. रावेर लोकसभा निवडणूक २०२४: रक्षा खडसे (भाजपा)
रक्षा खडसे यांचा विजय झाला आहे..त्या एकनाथ खडसे यांच्या स्नुषा असून वर्ष 2014 आणि वर्ष 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेल्या होत्या. रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार या पक्षाचे श्रीराम पाटील यांनी लढत दिली. सासरे एकनाथ खडसे यांनी जरी रक्षा खडसे यांचे काम केले असले तरी भावजई रोहिणी खडसे यांनी श्रीराम पाटील यांचे काम केले.

१७. औरंगाबाद लोकसभा निवडणूक २०२४: चंद्रकांत खैरे (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
चंद्रकांत खैरे यांचा औरंगाबाद लोकसभेच्या जागेवरुन पराभव झाला आहे. तर येथून संदीपान भुमरे यांचा विजय झाला आहे. याशिवाय औरंगाबाद येथून एमआयएमच्या इम्तियाज जलील देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. 

१८. रायगड लोकसभा निवडणूक २०२४: सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
सुनील तटकरे हे रायगड येथून विजयी झाले आहेत. ते २०१९ मध्ये याच मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अनंत गीते यांना तिकीट जाहीर करण्यात आले होते. 

१९. अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणूक २०२४: निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार)
निलेश लंके हे अहमदनगर येथून विजयी झाले आहेत.त्यांनी पारनेर - नगर विधानसभेच्या आमदार पदाचा राजीनामा दिला असून शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या विरोधात भाजपाने सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांना तिकीट दिले होते. ते २०१९ मध्ये येथूनच खासदार म्हणून निवडून आले होते. घराणेशाही आणि सामान्य कार्यकर्ता अशीच येतील निवडणूक लढवली गेली.

२०. हातकणंगले लोकसभा निवडणूक २०२४: राजू शेट्टी (स्वाभिमान पक्ष)
राजू शेट्टी हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांचा २०१९ मध्ये शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी पराभव केला होता. यावेळीही ते मैदानात असून तिरंगी लढत येथे होत आहे. शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती. 

आणखी वाचा : 

Lok Sabha Elections 2024 Results Live Updates : भारताला बदमान करणाऱ्यांना हिमाचल प्रदेशातून सडेतोड उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

LIVE कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2024 महाराष्ट्र, श्रीकांत शिंदेंचा मोठा विजय; 2 लाखांच्या मताधिक्याने ठाकरेंचा उमेदवार पराभूत

 

Share this article