
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाने पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नाशिक, ठाणे, मुंबई, बीड, परभणी, हिंगोली, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे नागरिकांसह स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या ओडिशातील संबलपूरच्या वायव्येस कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) सक्रिय आहे. तसेच छत्तीसगड आणि ओडिशा परिसरातील वातावरणातील बदलाचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत आहे. यामुळेच राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः नांदेडसह मराठवाड्यातील अनेक भागांत जोरदार पावसामुळे धान आणि इतर खरीप पिकांना मोठा फायदा होणार आहे. नाले आणि लहान ओढ्यांमध्येही पाण्याचा प्रवाह वाढू लागला आहे.
राज्यात समाधानकारक पाऊस होत आहे. मात्र अनेक धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठा वाढण्यासाठी आणखी पावसाची गरज आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.