
मुंबई : महाराष्ट्रातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (High Security Registration Plate – HSRP) लावण्याबाबत राज्य शासनाने आदेश दिले होते. मागील तीन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू असली तरी अजूनही सुमारे ७०% वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट बसविल्या नाहीत. मात्र, आता सरकारने या वाहनधारकांना दिलासा देत अंतिम मुदत वाढवली आहे.
जुन्या वाहनांना अंतिम मुदत वाढ
१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना HSRP बसविण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ होती. पण वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने ही मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे अजून HSRP न लावलेल्या वाहनधारकांना आता काही महिने अधिक मिळाले आहेत.
सध्याची HSRP लावण्याची स्थिती
राज्यात आतापर्यंत केवळ २०% वाहनांवरच HSRP प्लेट बसविण्यात आल्या आहेत. सुमारे १०% वाहनधारकांनी HSRP बसविण्यासाठी अपॉईंटमेंट घेतली आहे. मात्र, उर्वरित ७०% जुन्या वाहनधारकांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
ऑनलाईन अपॉईंटमेंटची सुविधा
वाहनधारकांनी ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत HSRP बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या (http://transport.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर जाऊन अपॉईंटमेंट घ्यावी. यामध्ये दिलेल्या मुदतीपर्यंत अपॉईंटमेंट असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
१ डिसेंबरपासून कारवाई सुरू
३० नोव्हेंबर २०२५ नंतर HSRP न बसविलेल्या वाहनांवर १ डिसेंबर २०२५ पासून वायुवेग पथकाद्वारे कारवाई केली जाईल. यात दंड आकारण्यासोबतच काही प्रकरणांमध्ये वाहन जप्त करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांनी लवकरात लवकर HSRP बसविण्याचे आवाहन सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.