
मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरातील मोठ्या फूड चेन आणि रेस्टॉरंट्सविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली आहे. या कारवाईत कराडमधील सफायर फूड्स कडून चालवल्या जाणाऱ्या पिझ्झा हट (Pizza Hut) आउटलेटचा परवाना निलंबित करण्यात आला. येथे शाकाहारी आणि मांसाहारी पिझ्झा तयार करण्यासाठी स्वतंत्र ओव्हन आणि पॅनचा वापर केला जात नसल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले. राज्यातील 104 चेन रेस्टॉरंट्सची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये पाच आस्थापनांचे लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत.
कराड येथील पिझ्झा हट आउटलेटची एफडीएच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यावेळी व्हेज आणि नॉन-व्हेज पिझ्झा तयार करण्यासाठी वेगवेगळे ओव्हन आणि पॅन वापरले जात नसल्याचे आढळले. अशातच अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याने संबंधित आउटलेटचा परवाना निलंबित करण्यात आला.
अकोल्यातील Sapphire Foodsच्या आणखी एका आउटलेटवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान 55 किलो फ्रीज करण्यात आलेले पनीर जप्त करण्यात आले. हे पनीर चुकीच्या लेबलिंगचे आणि दर्जाहीन असल्याचे एफडीएने नमूद केले.
एफडीएने महाराष्ट्रातील 104 चेन रेस्टॉरंट्स आणि फूड आस्थापनांची विशेष तपासणी केली. यामध्ये केएफसी, पिझ्झा हट, मॅक डोनल्ड, सबवे, बर्गर किंग आणि मोंजिनीस मोठ्या ब्रँड्सचा समावेश होता.
नाशिक जिल्ह्यातील पाच खाद्य आस्थापनांचे लायसन्सही निलंबित करण्यात आले. यामध्ये सातपूरमधील हॉटेल सायली रेस्टॉरंट आणि बार, कॉलेज रोडवरील हॉटेल छोटे मिया, पंचवटीतील पेठ रोडवरील मणी मार्क, सिडकोमधील अभिषेक बेकरी आणि स्वीट्सआणि दिंडोरीतील मोहनलाल नमकीन यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान स्वच्छता, अन्न साठवणूक, पाणीपुरवठा, उपकरणे आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित त्रुटी आढळल्याचे FDAने सांगितले.
मुंबईत मुलुंड येथील मुंबई मेट्रो ढाबा, भांडूपमधील गुलशन-दा-पंजाब ढाबा यांचेही लायसन्स निलंबित करण्यात आले आहेत. येथे मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, कीटक नियंत्रण आणि अन्न साठवणुकीशी संबंधित त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
याआधी एफडीएने ब्लिंकिटच्या मालाड (पश्चिम) येथील सुविधेचे लायसन्स निलंबित केले होते. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात झुरळांचा प्रादुर्भाव, अयोग्य पद्धतीने साठवलेले अन्नपदार्थ, एक्सपायर्ड प्रोडक्ट्स ठेवण्यात आले होते. सर्व वस्तू गंजलेल्या रॅक्सवर ठेवल्याचेही समोर आले. तर कोल्ड स्टोरेजमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला होता.