
मुंबई : महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य आस्थापनांवर मोठी कारवाई केली आहे. राज्यभर राबवलेल्या तपासणी मोहिमेत पाच हॉटेल आणि रेस्टॉरंटचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. बंदी घालण्यात आलेले पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थांसह सुमारे 25 लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
एफडीएच्या तपासणीत नियमांचे उल्लंघन केलेल्या 22 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे. तर गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईमध्ये स्वच्छतेचा अभाव, अन्नपदार्थांची चुकीच्या पद्धतीने स्टोअर करणे, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, कीटक नियंत्रणाचा अभाव आणि खाद्यपदार्थ हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांसह विविध नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले.
मुंबईतील मालाड पश्चिम येथील हॉटेल राधामध्ये एफडीएच्या अधिकाऱ्यांना अस्वच्छता आणि अन्नसुरक्षिततेबाबत त्रुटी आढळल्या. तपासणीदरम्यान एक मोठा उंदीर किचनमध्ये जाताना दिसला. तर आणखी एक उंदीर छताजवळ आढळल्याचे एफडीएने सांगितले. याशिवाय किचनमध्ये योग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता व्यवस्थाही नसल्याचे समोर आले. या कारणांमुळे हॉटेलचा फूड बिझनेसचा परवाना निलंबित करण्यात आला.
कुर्ला येथील जनता तवा अँड ग्रिलवरही एफडीएने कारवाई केली. तपासणीदरम्यान कच्चे चिकन आणि मांस प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये साठवून ठेवल्याचे आढळले.याशिवाय किचनमध्ये योग्य पद्धतीने कचऱ्यासाठी जागाही नव्हती.
खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॅन्टीनचा परवाना देखील निलंबित करण्यात आला आहे. अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित नियमांचे पालन न केल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले.
एफडीएने मुंबई, कोकण, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ आस्थापनांवर कारवाई केली. यावेळी गुटखा, पान मसाला, फ्लेवर्ड सुपारी आणि इतर बंदी असणाऱ्या पदार्थांचा सुमारे 11.40 लाख रुपयांचा साठा जप्त केला.या कारवाईत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 8 गुन्हे दाखल आणि सहा आस्थापने सील करण्यात आल्याची माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.
एफडीएच्या मोहिमेदरम्यान सुमारे 14,552 किलो दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने आणि इतर खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या मालाची किंमत सुमारे 13.90 लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.काही आस्थापनांमधून खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन ते अधिकृत प्रयोगशाळांमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे देवगिरी रुग्णालयाजवळील परमेष्ठी सुपर शॉपीमध्येही एफडीएच्या अधिकाऱ्यांना एक्सपायरी डेट असणारे फूड सापडले. याप्रकरणी संबंधित खाद्य व्यवसाय चालकाविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.