राज्यात भाजप काढणार संवाद यात्रा, पुण्यात होणार 5 हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे या भाजप संवाद यात्रेला उपस्थित राहणार आहेत.

Rameshwar Gavhane | Published : Jul 15, 2024 12:01 PM IST

विधानसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली असून भाजपकडून त्याअगोदर राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी २१ जुलै रोजी पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे. त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील.

संवाद यात्रेला भाजपचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी सहभागी होणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी ही माहिती दिली. भाजपचे सर्व प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही संवाद यात्रा काढण्यात येईल. या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजपचे पदाधिकारी पोहोचतील. महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. 

सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचविणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार येतील. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या यात्रेचे नियोजन २१ जुलै रोजी पुण्यात होईल. तर त्याअगोदर १९ जुलैला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून त्यात महाराष्ट्र पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव व सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

मविआ सरकार आले तर जनतेच्या लाभाच्या योजना बंद होतील

आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचे राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. जर चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील, असा आरोप बावनकुळे यांनी लावला.

आणखी वाचा :

छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, राजकीय चर्चांना उधाण

 

 

 

 

 

Share this article