छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्व्हर ओक'वर, राजकीय चर्चांना उधाण

Published : Jul 15, 2024, 12:34 PM ISTUpdated : Jul 15, 2024, 12:37 PM IST
chhagan bhujbal

सार

छगन भुजबळ यांनी रविवारी बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. परंतु पूर्वनियोजित भेटींमुळे जवळपास एक तास वेटिंगवर थांबल्यानंतरही पवार यांनी छगन भुजबळ यांना भेटीची वेळ दिली नसल्याचे समजते. भुजबळ यांनी रविवारी बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती. मात्र सोमवारी दुसऱ्याच दिवशी ते पवार यांच्या भेटीसाठी गेल्याने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी छगन भुजबळ हे आपल्या ताफा घेऊन शरद पवार यांच्या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले. ही भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न भुजबळ यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यामध्ये भुजबळांचा ताफा कैद झाल्याने याबाबतची माहिती समोर आली. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी, या मागणीसाठी छगन भुजबळ यांनी ही भेट घेतली की यामागे काही वेगळी राजकीय गणिते आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आरक्षण प्रश्नावरुन शरद पवारांवर टीका करताना भुजबळ नेमकं काय म्हणाले?

मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकला. या निर्णयामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत छगन भुजबळ यांनी रविवारी बारामतीतील सभेत त्यांच्यावर जोरदार टीका केली. "व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवारसाहेबांनी तिथे यायला हवं होते. मात्र असे सांगितले जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी ५ वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला," असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

छगन भुजबळ आणि महायुतीतील नाराजी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्या नेतृत्वाविरोधात बंड केल्यानंतर त्यांना साथ देणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये छगन भुजबळ यांचाही समावेश होता. अजित पवार यांनी भाजप-शिवसेना या युती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर ८ सहकाऱ्यांसह भुजबळ यांनीही मंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर बराच काळ ते अजित पवार यांच्या बंडाचे समर्थन करत होते. मात्र लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या निमित्ताने भुजबळ दुखावले गेले आणि नंतर त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारलाच घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळाले. लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी नाशिकमधून भुजबळ यांचे नाव चर्चेत होते. भाजप हायकमांडकडूनच सुरुवातीला त्यांचे नाव सुचवण्यात आले होते. मात्र नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नाशिकची जागा सोडण्यास नकार दिला आणि छगन भुजबळ उमेदवारीच्या स्पर्धेतून बाहेर पडले. त्यानंतर भुजबळ यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली होती.

आणखी वाचा : 

IAS पूजा खेडकर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने मागवले अहवाल, पूजा यांची पदावरून केली जाणार हकालपट्टी?

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती