
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. आज दुपारी बीडच्या दौऱ्यावर जात असताना त्यांना अचानक भोवळ आली आणि प्रकृती अस्वस्थ झाली. त्यामुळे नियोजित दौरा तातडीने रद्द करत त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांना उष्माघात (स्ट्रोक) आणि अतिसाराचा त्रास झाल्याचं निदर्शनास आलं असून, सध्या त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.
कालच अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी थेट "मुंबई धडक" आंदोलनाची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभर बैठका घेऊन तयारीसाठी दौरे सुरू केले होते. मात्र आज दुपारी जालन्यावरून बीडकडे जाताना त्यांची प्रकृती बिघडल्याने सगळ्यांना धक्का बसला.
प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, उष्णतेमुळे त्यांना सनस्ट्रोक झाला आहे, शिवाय शरीराला अतिसाराचा त्रासही जाणवतो आहे. त्यामुळे सध्या त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि उन्हात फिरणं टाळण्याचंही बजावण्यात आलं आहे.
भलेही प्रकृती थकलेली असो, पण जरांगे पाटील यांचा निर्धार तसाच ठाम आहे. त्यांनी कालच जाहीर केलं होतं की २९ ऑगस्टपासून मुंबईत आमरण उपोषण सुरू होईल. त्याआधी २८ ऑगस्टला मी उपोषणाला बसणार आहे, फक्त तुम्ही मला सोडायला आलात तरी पुरे आहे, असं ते भावनिक आवाहन करत होते. दरम्यान, मराठवाड्यात विविध ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या बैठका आणि जनजागृती दौऱ्यांमुळे त्यांच्यावर शारीरिक ताण वाढला होता. त्यामुळेच आज त्यांची तब्येत बिघडल्याचं बोललं जात आहे.
आज सकाळी, दौऱ्यावर असतानाच जरांगे पाटील यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून भारत-पाकिस्तान युद्धाचा उल्लेख करत तीव्र प्रतिक्रिया दिली होती. केवळ मराठा आरक्षणासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय मुद्द्यांवरही त्यांनी परखड मत मांडलं.