
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस अक्षरशः राड्याने गाजला. भाजपाचे आमदार गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाढलेल्या वाकयुद्धाची परिणती आज थेट कार्यकर्त्यांच्या हाणामारीत झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेले काही दिवस सुरु असलेल्या या शाब्दिक युद्धात काल, बुधवारी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत धमकावले होते. हा वाद शमण्यापूर्वीच, आज विधिमंडळाच्या आवारातच दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले.
मिळालेल्या माहितीनुसार, विधानभवनाच्या लॉबीमध्ये पडळकर आणि आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. ही बाचाबाची धक्काबुक्कीपर्यंत पोहोचली आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण केली. यावेळी तिथे उपस्थित सुरक्षा रक्षक आणि इतरांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्हीकडील कार्यकर्त्यांना दूर केले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हाणामारीचे स्पष्ट दृश्य दिसत आहे.
या वादाची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली होती, जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनाच्या परिसरात गोपिचंद पडळकर यांना "मंगळसूत्र चोर" असे संबोधून डिवचले. यानंतर पडळकर यांनीही आव्हाडांवर जोरदार पलटवार केला. काल, पडळकर आणि आव्हाड आमनेसामने आले असता, दोन्ही बाजूंनी एकमेकांना शिवीगाळ करत धमकावण्यात आले. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी मिळाल्याचा आरोपही केला होता.
याच वादातून आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते थेट विधानभवनाच्या आवारातच एकमेकांना भिडल्याने या संघर्षाने आता गंभीर वळण घेतले आहे. हिवाळी अधिवेशनातही दोन्ही पक्षांचे आमदार विविध मुद्द्यांवरून आमनेसामने आले होते. मात्र, आजची घटना ही वैयक्तिक वादाची परिणती असल्याने यावर विधिमंडळात कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे.