
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यंदा एक अनोखा संकल्प केला आहे. केवळ वाढदिवस साजरा न करता, २२ ते ३० जुलै या कालावधीत राज्यभर 'जनविश्वास सप्ताह' म्हणून तो साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. हा सप्ताह केवळ अजितदादांच्या जन्मदिनानिमित्त नाही, तर जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे.
या आठवडाभरात राष्ट्रवादी काँग्रेस विविध सामाजिक आणि जनहितार्थ कार्यक्रम राबवणार आहे.
आरोग्य सेवा: तालुका, जिल्हा आणि गाव पातळीवर रक्तदान शिबिरे, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील.
पर्यावरण संवर्धन: अजितदादा पवार यांच्या पर्यावरण संवेदनशीलतेला अनुसरून वृक्षारोपण अभियान राबवले जाईल. "झाड माझी; सावली झाड माझी माऊली" या थीम अंतर्गत गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाईल.
युवा सक्षमीकरण: तरुण पिढीला सक्रिय आणि सजग करण्यासाठी युवा संकल्प शिबिरे घेतली जातील. मुंबई, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये ही शिबिरे होऊन तरुणांना प्रेरणा आणि सर्वंकष माहिती दिली जाईल.
महिला गौरव: महिला सक्षमीकरणासाठी विशेष मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. शिक्षण, स्वयंरोजगार, सूक्ष्म कर्ज, आणि कौशल्य प्रशिक्षणावर या मेळाव्यांमध्ये चर्चा होईल. विशेष म्हणजे, महिलांच्या योगदानाला गौरवण्यासाठी 'अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार' प्रदान केले जातील.
विचार मंथन: राष्ट्रवादी काँग्रेस विचार मंथन सभांमध्ये पक्षाची शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित विचारधारा आणि बौद्धिक सक्षमीकरण यावर भर दिला जाईल.
विकास प्रदर्शन: 'अजितदादा विकास प्रदर्शन' च्या माध्यमातून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक विकास प्रकल्पांचा आढावा आणि त्यांची माहिती थेट लोकांपर्यंत पोहोचवली जाईल.
जनसंपर्क मोहीम: 'राष्ट्रवादी संवाद यात्रा' द्वारे पक्षाचा जनसंपर्क वाढवण्यासाठी राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये दौरे काढले जातील. गावागावात चौपाल आयोजित करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या जातील आणि पक्षाच्या धोरणांचा प्रसार केला जाईल.
खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले की, हा 'जनविश्वास सप्ताह' म्हणजे केवळ एका नेत्याचा वाढदिवस साजरा करणे नव्हे, तर जनतेशी असलेला विश्वास अधिक दृढ करण्याची आणि सामाजिक बांधिलकी जपण्याची संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या सप्ताहाच्या माध्यमातून राज्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे पुन्हा एकदा दाखवून देणार आहे.