मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची नाशिकला हेलिपॅडवरच तपासणी, निवडणूक आयोगाला काय काय आढळलं?

सार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली.

 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. त्यासाठी नेतेमंडळी हेलिकॉप्टरने प्रवास करत आहेत. तसंच, काही दिवसांपूर्वी संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरमधून पैसे नेल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपावरून राज्यभरात बराच गदारोळ झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांचं हेलिकॉप्टर लँड होताच त्यांची बॅग आज तपासण्यात आली.

 

 

एकनाथ शिंदे आजही नाशिक दौऱ्यावर आहेत. आज एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर निलगिरी हेलिपॅडवर लॅण्ड झालं. हेलिकॉप्टर लॅण्ड होताच निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. या बॅगांमध्ये कपडे, औषधं आणि अन्य जीवनावश्यक वस्तू आढळल्या आहेत.

दरम्यान, नाशिकची जागा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पदरात पाडून घेतली आहे. महायुतीत ही जागा कोणाकडे जाईल यावर बरेच दिवस खलबते झाली. अजित पवार गटाकडून या जागेवरून छगन भुजबळांचं नाव चर्चेत होते. खुद्द मोदींनीच याच नावाची शिफारस केली होती, असंही भुजबळांनी सांगितलं होतं. परंतु, नाव जाहीर करण्यास उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही, असं सांगत छगन भुजबळांनी या निवडणुकीतून माघार घेतली. परिणामी एकनाथ शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या जागेवर हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. तर, ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे.

 

About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Share this article