
Lok Sabha Election 2024 : देशासह महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे ला पार पडले. अशातच महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच येत्या 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाराष्ट्रात महायुतीचा सर्वाधिक जागांवर विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, महाराष्ट्रात महायुती तिन्ही टप्प्यात बहुमतात असून पाचही टप्प्यात उत्तम कामगिरी करेल. याशिवाय महायुतीला महाराष्ट्रात सर्वाधिक जागांवर विजय मिळवण्यास यश येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 400 च्या पारचे स्वप्न पूर्ण करण्यात महाराष्ट्राची महत्त्वाची भूमिका असेल.
याशिवाय मुख्यमंत्र्यांनी घरी बसलेल्यांना कोणी मत देत का? असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसरात्र काम करतात. आज देशाची जी प्रगती आणि विकास झालाय तो पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात झाला आहे. वर्ष 2014 च्या आधीचा काळ पाहिला असता देशात बॉम्बस्फोट, घोटाळे, भ्रष्टाचार आणि अनेक गोष्टी होत होत्या. पण वर्ष 2014 नंतर एकतरी बॉम्ब फुटलाय का, घोटाळा झालाय का? अथवा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विरोधकांनी आरोप लावण्याची हिंमत केलीय का? खरंतर देशात आणि महाराष्ट्रात केलेल्या कामामुळे जनता मोदींना का देणार नाही मत असेही मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी म्हटले आहे.
गद्दार असल्याच्या आरोपांवरुन मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेहमीच उद्धव ठाकरे गटातून गद्दार, आमचा बाप चोरलाय, पक्ष चोरलाय, निशाण चोरलाय असे आरोप लावले जातात. यावरुनच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर देत म्हटले की, “माझ्यासाठी जे शब्द वापरले जातात ते त्यांच्यासाठी लागू होतात. कारण वर्ष 2019 मध्ये उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला असून वडिलांच्या विचारांना विकलेय. एवढे मोठे पाप उद्धव ठाकरे यांनी केलेय. यामुळे जनता कधीच उद्धव ठाकरेंना माफ करणार नाही. याशिवाय वर्ष 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी मित्रासोबत गद्दारी केली. महाराष्ट्रातील जनतेला फसवले आणि बाळासाहेबांच्या विचारांनाही फसवले. भाजप आणि शिवसेना युतीचे सरकार व्हावे यासाठी नागरिकांनी मत दिली होती. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले.”
चौथ्या टप्प्यातील मतदान
येत्या 13 मे ला चौथ्या टप्प्यातील मतदान नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघात पार पडणार आहे.
महाराष्ट्रात नऊ जागा राखीव
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यामधील पाच जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. चार जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहे. अशातच महाराष्ट्रातील एकूण नऊ जागा राखीव आहेत.
आणखी वाचा :
काँग्रेसधमध्ये शरद पवारांना पक्ष करायचा होता विलिन पण.... संजय निरुपम यांनी केले हे खुलासे
ईव्हीएम हॅक करण्यासाठी उबाठा नेते अंबादास दानवेंना अडीच कोटींची मागणी, आरोपी जवानाला अटक