Sudhakar Bhalerao Join Ncp Sharad Pawar Group : उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार लातूरमध्ये भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहे. लातूरचे माजी आमदार भाजपची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
Sudhakar Bhalerao Join Ncp Sharad Pawar Group : लातूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे 11 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
राज्यात महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार दणका दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला धक्के देण्याची मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शिवसंकल्प दौऱ्यात माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला धक्का दिला. आता शरद पवारांकडून भाजपला मराठवाड्यात दुसरा दणका बसणार असल्याचे समजते.
क्रीडामंत्री बनसोडेंविरोधात भालेराव निवडणुकीच्या रिंगणात?
माजी भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांचा येत्या 11 जुलै रोजी आपल्या मोजक्या समर्थकांसह मुंबईत शरद पवार, जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होणार असल्याचे वृत्त आहे. राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात सुधाकर भालेराव हे शरदचंद्र पवार पक्षातून अर्थात महाविकास आघाडीतून उदगीर विधानसभा मतदारसंघात मैदानात उतरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
लातूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार
यापूर्वी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षामध्ये झालेला आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाचे दोन माजी आमदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आले आहेत. त्यामुळे लातूर जिल्ह्यात शरद पवार गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. या शिवसंकल्प मेळाव्यादरम्यान भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. राजू शिंदेंसोबत भाजपचे नगरसेवक गोकुळ मलके, प्रल्हाद निमगावकर, अक्रम पटेल, प्रकाश गायकवाड, रुपचंद वाघमारे यांनीही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
आणखी वाचा :
वसंत मोरे आज शिवसेना पक्षात करणार पक्षप्रवेश, मातोश्रीवर जाऊन करणार शक्तिप्रदर्शन
'तुम्ही उपाय शोधा, आम्ही तुमच्यासोबत...', मराठा आरक्षणावर मंचावरून उद्धव ठाकरे काय म्हणाले?