कोल्हापूर हादरलं! स्टंटबाज अल्पवयीन मुलांच्या गाडीखाली विद्यार्थिनी, जागीच मृत्यू

Published : Jul 25, 2025, 10:13 AM IST
Kolhapur Accident

सार

कोल्हापूरमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणांकडून 18 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात एक धक्कादायक अपघात घडला आहे. अल्पवयीन मुलांच्या स्टंटबाजीमुळे एका १८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला असून, इतर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. भोगावती महाविद्यालय, कुरकली येथून गावाला परतणाऱ्या विद्यार्थिनी बसची वाट पाहत उभ्या होत्या, तेव्हाच भरधाव स्विफ्ट गाडीने त्यांना जोरदार धडक दिली.

ही दुर्घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. भोगावती महाविद्यालयापासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या एसटी बस थांब्यावर ५० हून अधिक विद्यार्थी राधानगरी व कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसची वाट पाहत होते. तेव्हा स्विफ्ट कार भरधाव वेगात आली आणि थेट विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसली. या भीषण धडकेत प्रज्ञा दशरथ कांबळे (वय १८, रा. कौलव, ता. राधानगरी) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिचा मृतदेह काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

अपघातात जखमी झालेल्या तीन विद्यार्थिनींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये काहींची प्रकृती गंभीर आहे. या अनपेक्षित घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. गाडी धडक दिल्यानंतर देखील चालकाने गाडी थांबवली नाही, उलट भोगावतीच्या दिशेने गाडी सुसाट पळवली.

या अपघातानंतर बस थांब्यावर उपस्थित असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी धाडस दाखवत गाडीचा पाठलाग केला आणि भोगवती ठिपकुरली फाट्याजवळ त्या गाडीला अडवलं. गाडीमध्ये चार अल्पवयीन मुलं होती. यापैकी दोनजण घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गाडीचा चालक राजवर्धन सुरेश परीट (रा. राशिवडे) आणि त्याच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी अल्पवयीन मुलांकडून होणाऱ्या वाहन चालवण्याच्या घटनांना आळा घालण्याची मागणी केली आहे. प्रशासन आणि पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू असून, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!