
पुणे: पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी दुपारी एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल कोसळला आणि त्या एका क्षणात सर्व काही उध्वस्त झालं. या घटनेनंतर अनेक पर्यटक वाहून गेले, तर काहीजण पुलाच्या लोखंडी सांगाड्याखाली अडकले. त्यापैकी एक दृश्य असं होतं की, एका वृद्धाचा चेहरा पाण्याबाहेर तर शरीर लोखंडाखाली अडकलेलं!
हा वृद्ध नदीच्या प्रवाहात अडकलेला, फक्त चेहरा पाण्याबाहेर... श्वास घेण्याचा प्रत्येक क्षण मृत्यूशी झुंज देणारा. एनडीआरएफच्या जवानांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर त्याला वाचवलं. लोखंडी सांगाडा कटरने कापावा लागला, तेंव्हा कुठं तो बाहेर आला. प्रत्येक मिनिट इथे अनमोल होता.
कुंडमळा हे पुण्याजवळचं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ. रविवारची सुट्टी असल्याने हजारो लोक तिथं आले होते. दुपारी ३ च्या सुमारास पावसामुळे भरून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला. प्रत्यक्षदर्शींनुसार, पूल कोसळताना जवळपास १०० पर्यटक त्यावर उभे होते.
पूल कोसळल्यानंतर परिसरात किंकाळ्यांचा एकच गोंगाट. अनेक जण प्रवाहात वाहून जाताना दिसले. ही पूर्ण घटना एका मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो.
एनडीआरएफच्या जवानांनी आत्तापर्यंत ३८ जणांना वाचवलं आहे, तर ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय १५ जण जखमी असून, त्यातील ६ गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहेत. घटनास्थळी मोठा पोलिस आणि आपत्कालीन यंत्रणेचा फौजफाटा तैनात आहे. क्रेनच्या मदतीने पुलाचा सांगाडा बाजूला काढण्याचे काम सुरु आहे.
अलीकडील अपघातांच्या मालिकेने संपूर्ण देश हादरला आहे. एकीकडे विमान अपघातात २५० हून अधिक जणांचा मृत्यू, दुसरीकडे केदारनाथ यात्रेतील हेलिकॉप्टर दुर्घटना आणि आता ही पूल दुर्घटना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामान्यांचा जीव असा रोज जातोय.
ही दुर्घटना केवळ भौतिक स्वरूपाची नाही, तर ती व्यवस्थेतील ढिसाळपणाचा आरसा आहे. जुने, कमकुवत पूल, देखभाल नसलेली रचना, आणि हजारो पर्यटकांच्या गर्दीतही सुरक्षा उपायांची वानवा याचे परिणाम भयावह आहेत. पण त्या वृद्धाचा चेहरा, पाण्याबाहेर लढत असलेला श्वास, आणि तीन तासांची आशेची लढाई मानवतेचा झगडा आणि न संपणाऱ्या प्रशासनाच्या चुकांचा आरसा ठरतो.