Vaishnavi Hagawane Suicide आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

Published : May 30, 2025, 08:21 PM ISTUpdated : May 30, 2025, 08:24 PM IST
Vaishnavi Hagawane Case

सार

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिंपरी - बहुचर्चित वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. या प्रकरणात निलेश चव्हाण याच्यावर वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावणे, तसेच मानसिक त्रास देणे यासह अन्य गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. विशेषतः वैष्णवीच्या चुलत्यांना धमकी देणे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपांमुळे निलेश चव्हाणवर कारवाईची मागणी होत होती.

फरार आरोपीच्या शोधासाठी सहा पथकांची रात्रंदिवस शोधमोहीम

या प्रकरणात निलेश चव्हाण फरार झाल्यापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहा स्वतंत्र पथकं त्याच्या शोधासाठी रात्रंदिवस कार्यरत होती. प्रारंभी तो महाराष्ट्राबाहेर, कदाचित इतर राज्यात लपल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली होती. मात्र तपास अधिक खोलवर गेल्यानंतर तो नेपाळमध्ये असल्याचा सुगावा लागला.

यावर तातडीने कृती करत, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने सीमावर्ती भागात जाऊन नेपाळमध्ये कारवाई करून त्याला अटक केली. यावेळी स्थानिक अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

लवकरच भारतात आणून अधिक चौकशी

निलेश चव्हाणला आता अधिकृतरित्या भारतात आणून पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याच्यावर असलेल्या गंभीर आरोपांच्या अनुषंगाने पुढील तपास अधिक गतीने होणार आहे. पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपशील देण्याचे टाळले असले, तरी निलेशकडून प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली होती. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी सातत्याने न्यायासाठी लढा दिला. आता मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने प्रकरणाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. पोलीस पुढील कारवाईत काय उकल करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

रत्नागिरीची वेदा ठरतेय इंटरनेट सेन्सेशन, वय 1 वर्ष 9 महिने, 100 मीटर पोहून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डममध्ये विक्रमाची नोंद!
मोठी बातमी! शेतकरी कुटुंबाला मिळतील 'एवढे' लाख रुपये, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती!