
पुणे | प्रतिनिधी राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या हगवणे कुटुंबावर आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. माजी राष्ट्रवादी काँग्रेस नेते राजेंद्र हगवणे यांचे पुतणे संतोष हगवणे यांच्यावर आर्थिक फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. संतोष हगवणे यांनी 'खुर्ची' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील यांनी आरोप केला आहे की, संतोष हगवणे यांनी त्यांचे लाखो रुपये थकवले असून, त्यांना धमकावण्यात आले आहे. या प्रकरणी पाटील यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तसेच पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, हगवणे कुटुंबाच्या इतर सदस्यांवरही विविध गंभीर आरोप आहेत. राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक हगवणे याच्यावर जेसीबी व्यवहारात 11.70 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रशांत येळवंडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, शशांक हगवणे याने 25 लाख रुपयांच्या जेसीबी व्यवहारात सुरुवातीला 5 लाख रुपये घेतले आणि नंतर दर महिन्याला 50 हजार रुपये घेतले. मात्र, हाफ्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला आणि पैसे परत न दिल्याचा आरोप आहे.
या सर्व प्रकरणांमुळे हगवणे कुटुंबाच्या सामाजिक आणि राजकीय प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.