
Hingoli : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना दोन्ही आघाड्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण तीव्र झाले आहे. महायुतीतील भाजप–शिवसेना तसेच महाविकास आघाडीतील शिवसेना–कॉंग्रेसमध्ये आरोप–प्रत्यारोपाचे वातावरण तयार झाले आहे. मागील काही दिवसांत भाजप आणि शिवसेनामधील फोडाफोडीचा वाद चांगलाच रंगला असून तो थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या तक्रारी मांडल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपकडून शिवसेनेचे उमेदवार पळवले जात असल्याच्या तक्रारी असतानाच हिंगोलीत मात्र उलट चित्र दिसले. हिंगोली नगरपालिका निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांनी भाजपचा अधिकृत उमेदवार भास्कर बांगर यांना उमेदवारी मागे घ्यायला लावून शिवसेनेत प्रवेश दिला. प्रभाग 16 ‘ब’ मधील भाजप उमेदवाराने निवडणुकीसाठी अवघा एक दिवस राहिला असताना माघार घेतली आणि शिवसेनेच्या उमेदवार श्याम कदम यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे या स्थानिक फोडाफोडीत भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
फोडाफोडीच्या या राजकारणावरून शिवसेना मंत्र्यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्या बैठकीत भविष्यात कोणीही एकमेकांच्या पक्षातील उमेदवार, पदाधिकारी किंवा नेते घेऊ नयेत, असा निर्णय झाल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मात्र, हा निर्णय दुसऱ्याच दिवशी हिंगोलीच्या घटनेमुळे मोडीत निघाला. यामुळे महायुतीतील तणाव आणखी वाढल्याचे चित्र आहे.
वाशिम जिल्ह्यात ठाकरे गटातही असंतोष उफाळला आहे. उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्यांच्यासाठी आलेला एबी फॉर्म मापारी यांनी आपल्या पत्नीच्या अर्जाला जोडल्याचा ठेंगडे यांचा आरोप आहे. त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून त्यामुळे रेखा मापारी यांच्या उमेदवारीवर संकट निर्माण झाले आहे. ठेंगडे यांचे थेट आव्हान ठाकरे गटाला मोठी अडचण ठरणार आहे.