
रायगड: अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेने देश हादरला असून, या अपघातात उरणजवळील न्हावा गावातील एअर इंडियाच्या 23 वर्षीय हवाईसुंदरी मैथिली पाटील हिचाही सहभाग असल्याचे समजल्यावर संपूर्ण गाव शोकाकुल झाले आहे. घराघरात हळहळ व्यक्त होत असून, तिच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण गावच तिच्या सुखरूपतेसाठी देवाकडे प्रार्थना करत आहे.
ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे आलेली मैथिली गेल्या दोन वर्षांपासून एअर इंडियामध्ये हवाईसुंदरी म्हणून कार्यरत होती. उरण तालुक्यातील न्हावा या छोट्याशा गावातून तीने आपला एव्हिएशनपर्यंतचा प्रवास अत्यंत मेहनतीने पूर्ण केला होता. तिला भजनात विशेष रुची होती तसेच प्राण्यांवरही तिचे विशेष प्रेम होते. शांत, संयमी आणि नितळ हास्य असलेल्या मैथिलीने आपल्या स्वप्नांना गती देत अनेक तरुणांसाठी प्रेरणा निर्माण केली होती.
गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या दिशेने उड्डाण करण्याआधी मैथिलीने वडिलांना फोन करून आपली पुढील फ्लाइट असल्याची माहिती दिली होती. हा संवाद तिच्या वडिलांसाठी शेवटचा ठरला, ही कल्पना त्यांच्या डोळ्यासमोरून जात नाही.
मैथिलीची बालमैत्रीण सांगते, "काही दिवसांपूर्वी आमच्या गप्पा सुरु होत्या. त्यावेळी तीने हसत ‘बाय... सी यू...’ असा मेसेज केला. तोच तिचा शेवटचा मेसेज ठरला, यावर विश्वासच बसत नाही. ती कृष्णभक्त होती. आमच्या प्रत्येक भेटीत तिच्यात एक प्रकारची सकारात्मकता जाणवत होती." ही आठवण सांगताना तिच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.
अपघाताची बातमी समजताच पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तिची आई आणि मामा तात्काळ अहमदाबादकडे रवाना झाले. दरम्यान, गावातील शेकडो नागरिक तिच्या घराजवळ जमले आणि परिस्थितीची माहिती घेऊ लागले. उरणचे आमदार महेश बालदी, माजी आमदार प्रशांत ठाकूर आणि इतर राजकीय नेत्यांनीही घराला भेट देऊन कुटुंबीयांना धीर दिला.
टी. एस. रेहमान कॉलेजच्या अलीकडच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मैथिलीने हवाई क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. वैभव म्हात्रे यांच्या मते, “ती शांत, पण ठाम विचारांची मुलगी होती. तिच्या आठवणी आजही मनात रेंगाळतात.”