
Gopichand Padalkar Statement : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत ही घटना महाराष्ट्रासाठी मोठे नुकसान असल्याचे म्हटले आहे. विमान अपघात होता की घातपात, यावर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी वरिष्ठ स्तरावरूनच याबाबत स्पष्टता येईल, असे नमूद केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना पडळकर म्हणाले की, हा दोन्ही पक्षांचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाबाबत संबंधित नेतेच भूमिका स्पष्ट करतील. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सक्षमपणे काम करत असल्याने विलीनीकरण झाले तरी राज्यातील स्थितीत फारसा फरक पडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील कथित वादाबाबत विचारले असता पडळकर यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. दोन्ही वरिष्ठ नेते असून आपण छोटा कार्यकर्ता असल्याची टिप्पणी त्यांनी केली.
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पडळकर यांनी तीव्र भूमिका मांडली. धनगर समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नसल्याचे सांगत सरकारने याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि खुली चर्चा घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. समाजाच्या हक्कासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
राज्यात सुरू असलेल्या टिपू सुलतान वादावर बोलताना पडळकर यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्यांवर त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. काँग्रेसवर मतांच्या राजकारणाचा आरोप करत त्यांनी शिवराय देशाची अस्मिता असल्याचे नमूद केले. टिपू सुलतानाचे फोटो सार्वजनिक ठिकाणांहून हटवावेत, अशी मागणीही त्यांनी केली. हा मुद्दा राजकारणाचा नसून अस्मितेचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.