गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीस यांचा हस्तक्षेप चर्चेत

Published : May 30, 2025, 01:51 PM ISTUpdated : May 30, 2025, 04:59 PM IST
naved mushrif

सार

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ म्हणजेच ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदासाठी सध्या चांगलाच राजकीय रंग चढला आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ यांची बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून या अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात जिल्हा आणि राज्यस्तरावर विविध राजकीय घडामोडी पाहायला मिळत होत्या. विशेषतः हा अध्यक्ष महायुतीकडूनच निवडून यावा यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्याचे बोलले जात आहे.

गोकुळचे अध्यक्षपद हे केवळ स्थानिक राजकारणापुरते मर्यादित न राहता राज्याच्या राजकीय समीकरणात महत्त्वाचे ठरत असल्याने यंदाची निवडणूक विशेष गाजली. 'गोकुळ' दूध संघाचा अध्यक्ष महायुतीचा असावा, यासाठी राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्याचे सूत्रांकडून समजते.

सर्वपक्षीय सहमतीतून नावेद मुश्रीफ यांची निवड

या निवडीनंतर गोकुळ संघाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. स्वयं नावेद मुश्रीफ यांनी ही निवड एकत्रित सहमतीतून झाल्याचे सांगितले. “सर्व सहमतीने जो निर्णय झाला, तो आम्ही मान्य केलेला आहे. राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे चेअरमन सतेज पाटील यांनीच माझं नाव सुचवलं. आम्ही सर्वांचे आभार मानतो. पुढे गोकुळच्या प्रगतीसाठी शासन दरबारी ठोस प्रयत्न करावे लागतील. हम सब एक हैं,” असे त्यांनी सांगितले.

नावेद मुश्रीफ: सामाजिक क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व

नावेद मुश्रीफ हे केवळ राजकीय वारशाचे धारक नसून सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. कागलमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी रॉयल विद्यापीठ, दिल्ली येथून सामाजिक कार्य विषयात पीएच.डी. मिळवली.

त्यांची कारकीर्द ३ एप्रिल २०१० रोजी छत्रपती शिवाजी विविध विकास सोसायटीच्या संचालकपदी निवड होऊन सुरू झाली. त्यानंतर ४ मे २०२१ पासून ते गोकुळ दूध संघाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही त्यांनी नेतृत्व स्वीकारले आहे.

हसनसो मुश्रीफ फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणून नावेद मुश्रीफ यांनी अनेक समाजोपयोगी आरोग्य सेवा प्रकल्प हाती घेतले आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्य करताना त्यांनी राज्यभरात युवक संघटनांची उभारणी केली.

अखेरच्या क्षणी समीकरणे बदलली

मूळत: गोकुळ संघाचे संस्थापक आनंदरावर पाटील चुयेकर यांचे सुपुत्र शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित मानले जात होते. अनेक चर्चांनंतर त्यांच्या नावावर मोहोर लागण्याची शक्यता होती. मात्र, अंतिम क्षणी वरिष्ठ राजकीय पातळीवर हालचाली झाल्या आणि नावेद मुश्रीफ यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली.

या निवडीनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणात नव्याने हालचाली होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘गोकुळ’च्या माध्यमातून केवळ दुग्धव्यवसायच नव्हे, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नकाशावरही परिणाम होणार, यात शंका नाही.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BMC Elections 2025 : महापालिका निवडणुकीसाठी भाजप–शिंदे गट एकत्र लढणार; महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात
Shivraj Patil Chakurkar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन