
मुंबई : कोकणात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी आपापल्या गावी धाव घेतात. यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी बाप्पांचं आगमन होणार असून, त्याच्या स्वागतासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) सज्ज झालं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाने यंदा ५,००० जादा ‘गणपती स्पेशल’ बसेस धाववण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष तयारी करत २३ ऑगस्ट २०२५ पासून मुंबई, ठाणे, पालघर या प्रमुख शहरांतील एसटी बसस्थानकांमधून या जादा बसेस कोकणासाठी सुटणार आहेत. या विशेष सेवा ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार आहेत. गेल्या वर्षी ४,३०० बसेस सोडण्यात आल्या होत्या, तर यंदा हा आकडा ५,००० वर गेला आहे. म्हणजे प्रवाशांसाठी अधिक सुलभ प्रवासाची हमी!
या ‘गणपती स्पेशल’ बसेससाठी २२ जुलै २०२५ पासून आरक्षण सुरू होणार आहे. त्यामुळे ज्यांना वेळेत आणि सोयीस्कर प्रवास हवा आहे, त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून ठेवणं फायदेशीर ठरेल.
आपलं आरक्षण खालील माध्यमांतून करता येईल.
अधिकृत संकेतस्थळ: www.npublic.msrtcors.com
एसटी महामंडळाचे मोबाईल ॲप: MSRTC Bus Reservation App
जवळचं एसटी बसस्थानक
महत्वाची बाब म्हणजे, गणपती स्पेशल गाड्यांमध्ये देखील सवलतीचा लाभ मिळणार आहे.
अमृत ज्येष्ठ नागरिक (७५ वर्षांवर): १००% सवलत
ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवर) आणि महिला प्रवासी: ५०% सवलत
यासोबतच व्यक्तिगत आरक्षणासह गट आरक्षणाचाही पर्याय उपलब्ध असेल.
गणपतीच्या काळात प्रवास सुरळीत पार पडावा यासाठी एसटी महामंडळाने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
प्रत्येक महत्त्वाच्या बसस्थानकावर वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखरेख
महामार्गांवर वाहन दुरुस्ती पथकांची तैनाती
वाहतुकीवर २४x७ लक्ष ठेवणारे कर्मचारी
बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात जाण्याची तयारी आता लगेच सुरू करा. प्रचंड गर्दी लक्षात घेता, आपलं आरक्षण वेळेत करून ठेवा आणि आपल्या गणपती भेटीचा आनंद बिनधास्त लुटा!