Devendra Fadanvis: मुंबईतील भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटावर जोरदार टीका केली. २०१९ मधील विश्वासघात, कोरोना काळातील भ्रष्टाचार आणि विकासाच्या मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरेंना लक्ष्य केले.
मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या विजय संकल्प मेळाव्यात आक्रमक भाषण करत विरोधकांवर जोरदार टीका केली. "बेस्टच्या निवडणुकीत तुमच्या ब्रँडचा बँड वाजवला आहे. बाळासाहेब ठाकरे हे खरे ब्रँड होते, पण तुम्ही नाही. आमच्याकडे जगातला सर्वात मोठा ब्रँड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी!" असा टोलाही फडणवीसांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला.
28
"कोणत्याही परिस्थितीत महापालिका जिंकायचीच!"
मुंबई भाजपच्या अमित साटम आणि आशिष शेलार यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात फडणवीस म्हणाले, “कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असणार. मागच्या वेळी महापौरपद थोडक्यात हुकलं, पण यावेळी कोणाचीही युती होऊ दे, आपला विजय कुणीही रोखू शकणार नाही.”
38
"१९८५ पासून विकासाच्या नावाने फसवणूक"
“१९८५ साली राजीव गांधी धारावी पुनर्वसनाबद्दल बोलले होते, पण काँग्रेसने सत्तेत असूनही काहीच केलं नाही. सत्ता वापरली पण मुंबईकरांसाठी नाही. आणि आता हेच लोक आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात,” असा टोलाही फडणवीसांनी विरोधकांना लगावला.
"कफनमध्ये पैसे खाल्ले, आणि आम्हाला शिकवायला निघाले!"
कोरोना काळात घोटाळ्यांचे उदाहरण देत फडणवीस म्हणाले, “जे लोक कफनमध्ये पैसे खाऊ शकतात, त्यांनी आम्हाला नैतिकतेवर शिकवू नये.”
58
"‘अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का...’"
२०१९ मधील शिवसेनेच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं, “त्या वेळी आपल्याकडे महापौरपद होते. पण एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे महापौरपद हवं आहे. आम्ही मन मोठं करून शिवसेनेला ते पद दिलं. पण मग काय झालं? 'यार ने ही लुट लिया घर यार का...' असं वाटलं.”
68
"विकास कुठे? भाषणात त्याचा उल्लेख तरी आहे का?"
"उद्धव ठाकरे यांच्या भाषणात विकासाचा एक वाक्य दाखवा, मी तुम्हाला १०० रुपये देईन!" असा उपरोधिक सवाल करत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. “मुंबईकरांच्या आयुष्यात काय बदल करणार, यावर एक शब्द तरी बोला,” असं आव्हानही त्यांनी दिलं.
78
"गनिमी कावा केला, आता एकहाती सत्ता!"
“२०१९ मध्ये धोका दिला गेला, पण आम्ही रडत बसलो नाही. २०२२ मध्ये गनिमी कावा केला आणि २०२४ ला एकहाती सत्ता घेतली. आता २०२५ मध्ये मुंबईत आपलाच महापौर होणार,” असा आत्मविश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
88
"शेवटी मुंबईकर ठरवतील कोण सच्चा!"
"काही उचक्के दररोज काहीतरी बडबडतात. पण मुंबईकरांनी याआधीच त्यांना उत्तर दिलं आहे," असं सांगून संजय राऊतांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आला.