
धुळे: “अर्रर्रर्र…हे काय झालं?” असं म्हणण्याची वेळ आली धुळे शहरातील नागरिकांवर, जेव्हा एका तरुणाची कार थेट पांझरा नदीपात्रात कोसळली! आणि यामागचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल गुगल मॅपमुळे हा सगळा घोळ झाला!
शनिवारी (३१ मे) दुपारी १ वाजता, धुळ्यातील कालिका देवी मंदिराजवळ ही थरारक घटना घडली. अमरावतीचा काशिनाथ धुरगांडे (वय ३५) हा तरुण आपल्या मित्राला भेटण्यासाठी देवपूरला निघाला होता. गुगल मॅपवर लोकेशन सेट करून तो भरधाव वेगात कार चालवत होता. मात्र, पुलावर पोहोचताच कारवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात कार थेट नदीपात्रात कोसळली.
नदीपात्रात पाणी नव्हते, म्हणूनच या अपघातात काशिनाथचा जीव वाचला. मात्र, त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले की, कार MH 22 BC 8808 क्रमांकाची होती आणि अपघातानंतर कारचे मोठे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, वाहन तपशील आणि मॅप नेव्हिगेशन संदर्भातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आणि बघ्यांचीही मोठी गर्दी जमली.
दुसरीकडे, पुण्यातील सदाशिव पेठ भागातही एक भीषण अपघात घडला. भरधाव कारने थेट १२ पादचाऱ्यांना उडवलं, त्यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ३ जणांची प्रकृती गंभीर असून, स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत सर्व खर्च उचलण्याचा निर्णय मिळवला आहे.
ही घटना फक्त एक अपघात नाही, तर डिजिटल यंत्रांवर अतीनिर्भरतेचा धोकादायक परिणाम देखील आहे. गुगल मॅप योग्य दिशादर्शन करत असला तरी शेवटी निर्णय तुमचा असतो. वाहन चालवताना सतर्क राहा, मॅपवर पूर्ण विश्वास ठेवणं टाळा.