
मुंबई: महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदलांची प्रक्रिया वेगाने सुरू असताना, पक्षाने राज्यातील २२ नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली आहे. मात्र, सर्वांच्या नजरा लागलेल्या मुंबई भाजप अध्यक्षपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही.
मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहराचा अध्यक्ष कोण होणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून, या निर्णयाची घोषणा थेट दिल्लीहून होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सध्या या पदासाठी आ. प्रवीण दरेकर यांचे नाव आघाडीवर असून, आ. अमित साटम आणि माजी आमदार सुनील राणे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा आहे. विद्यमान अध्यक्ष आशिष शेलार यांना पुन्हा संधी मिळेल, असे भासवत असले तरी खात्रीलायक सूत्रांनुसार त्यांना बाजूला ठेवण्याची शक्यता अधिक आहे.
म्हणूनच, अनेकांच्या नजरा या नव्या चेहऱ्याकडे वळल्या आहेत. राज्यात भाजपच्या अध्यक्षपदावरही बदलाची शक्यता असून, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याजागी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
या नव्या यादीत अनेक जुने भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक प्रभावशाली चेहरे झळकले आहेत. उदाहरणार्थ, नांदेड उत्तरला ॲड. किशोर देशमुख तर नांदेड दक्षिणला संतुकराव हंबर्डे यांची निवड झाली आहे. हंबर्डे हे मागील लोकसभा पोटनिवडणुकीत कमी मतांनी पराभूत झाले होते.
लातूर ग्रामीणचे अध्यक्षपद माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, तर लातूर शहरचे अध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांना मिळाले आहे. कव्हेकर हे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर यांचे सुपुत्र आहेत.
या यादीत भाजपच्या बड्या नेत्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. उदाहरणार्थ:
चंद्रपूर शहर – हंसराज अहीर यांचे निकटवर्ती सुभाष कासमगट्टावार
चंद्रपूर ग्रामीण – सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक हरीष शर्मा
बीड – मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती शंकर देशमुख
अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वासू अनिल मोहिते
कोल्हापूर शहर – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्ती विजय जाधव
भाग/जिल्हा नाव
उत्तर-पश्चिम मुंबई ज्ञानमूर्ती शर्मा
दक्षिण-मध्य मुंबई नीरज उभारे
दक्षिण मुंबई शलाका साळवी
पालघर भरत राजपूत
वसई-विरार प्रज्ञा पाटील
अहिल्यानगर अनिल मोहिते
नाशिक शहर सुनील केदार
नाशिक दक्षिण सुनील बच्छाव
नाशिक उत्तर यतीन कदम
पुणे दक्षिण (बारामती) शेखर वढणे
कोल्हापूर शहर विजय जाधव
गडचिरोली रमेश बारसागडे
चंद्रपूर शहर सुभाष कासमगट्टावार
चंद्रपूर ग्रामीण हरीष शर्मा
वर्धा संजय गाते
परभणी ग्रामीण सुरेश भुंबरे
छत्रपती संभाजीनगर किशोर शितोळे
लातूर शहर अजित पाटील कव्हेकर
लातूर ग्रामीण बसवराज पाटील
नांदेड उत्तर ॲड. किशोर देशमुख
नांदेड दक्षिण संतुकराव हंबर्डे
बीड शंकर देशमुख
मुंबईसारख्या राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील शहराच्या भाजप अध्यक्षपदाची निवड हा एक मोठा निर्णय आहे. त्यामुळेच ही घोषणा थेट केंद्रीय नेतृत्वाकडून दिल्लीतून होणार असल्याने, पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि विरोधकही या निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत. नवीन अध्यक्षांच्या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य येईल अशी अपेक्षा असून, मुंबई अध्यक्षपदाची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.