CBSE 10th Class Results : सीबीएसी बोर्ड परीक्षेत 93.70% विद्यार्थी पास; मुलींची पुन्हा बाजी, टॉपर्स लिस्टला ब्रेक

Published : Apr 16, 2026, 01:50 PM IST
MP Board Result 2026 Pass Percentage

सार

CBSE 10th Class Results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावीच्या निकालात यंदा 93.70% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस कामगिरी केली असून, उच्च गुण मिळवणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

CBSE 10th Class Results : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्युकेशन (CBSE) ने दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर केला. नव्याने लागू करण्यात आलेल्या ‘दोन बोर्ड परीक्षा’ धोरणाच्या पार्श्वभूमीवर घोषित झालेल्या या निकालात 93.70 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, पहिल्याच प्रयत्नात विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे.

मुलींचे वर्चस्व कायम

यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.99 टक्के असून, मुलांचे प्रमाण 92.60 टक्के इतके आहे. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मुलींची सातत्यपूर्ण आघाडी कायम असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

उच्च गुण मिळवणाऱ्यांची लक्षणीय संख्या

देशभरातून सुमारे 24.71 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 23.16 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2.21 लाखांहून अधिक असून, 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवणारे 55 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. विशेष गरजांच्या विद्यार्थ्यांनीही 96.24 टक्के इतका उल्लेखनीय निकाल नोंदवला आहे.

मेरिट लिस्टला पुन्हा ब्रेक

गुणांच्या स्पर्धेला आळा घालण्यासाठी यंदाही अव्वल विद्यार्थ्यांची यादी (मेरिट लिस्ट) जाहीर न करण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

शाळानिहाय निकालात केंद्रीय विद्यालय आघाडीवर

शाळानिहाय निकालात केंद्रीय विद्यालयांनी 99.57 टक्के निकालासह पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालयांचा निकाल 99.42 टक्के आहे. खासगी शाळांचा निकाल 93.77 टक्के, सरकारी शाळांचा 91.43 टक्के आणि अनुदानित शाळांचा 91.01 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. परदेशातील CBSE शाळांचाही निकाल 99.10 टक्के इतका उच्च राहिला आहे.

विभागनिहाय कामगिरी; पुणे सातव्या स्थानी

तिरुअनंतपुरम आणि विजयवाडा विभागांनी 99.79 टक्के निकालासह अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई (99.58%), दिल्ली पश्चिम (97.45%) आणि दिल्ली पूर्व (97.33%) हे विभाग त्यापाठोपाठ आहेत. पुणे विभाग 96.66 टक्के निकालासह सातव्या स्थानावर आहे, तर गुवाहाटी विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 85.32 टक्के आहे.

पुण्यात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

पुणे विभागातही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलमधील मुर्तजा रावत (99.8%), निहार लोहाडे (99.4%) आणि ऋषभ कोरलाहल्ली (99.2%) यांनी विशेष यश संपादन केले. अनेक शाळांचा निकाल 100 टक्के लागला असून, बहुसंख्य विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले आहेत.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Narendra Modi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मोदींच्या २५ वर्षांच्या कारकिर्दीचं कौतुक
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे न्यूयॉर्क टाइम्सच्या फ्रंट पेजवर 'रॉकस्टार'