
मुंबई | प्रतिनिधी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. लवकरच शाळा सुरू होणार असताना, एस.टी. महामंडळाने (MSRTC) विद्यार्थ्यांना दिलासा देत त्यांच्या बस पाससंदर्भात मोठी घोषणा केली आहे.
राज्यभरातील विद्यार्थ्यांना आता एस.टी. बस पास मिळवण्यासाठी वेगळं कार्यालय गाठण्याची गरज नाही. येत्या १६ जूनपासून थेट शाळांमधूनच एस.टी. बस पास उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी अधिकृत घोषणा परिवहन विभागाने केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.
दरवर्षी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर बस पाससाठी विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होते. या पार्श्वभूमीवर आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा, यासाठी शाळा स्तरावरच पास वितरणाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामुळे पालकांवरचा आर्थिक आणि वेळेचा ताणही कमी होईल, असा विश्वास MSRTC प्रशासनाने व्यक्त केला आहे.
विद्यार्थ्यांनी पाससाठी शाळेचे ओळखपत्र आणि आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा लागेल. काही ठिकाणी ऑनलाइन प्रक्रियाही सुरू करण्यात आली असून, जिल्हानिहाय वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.