बुलढाण्यात हृदयद्रावक घटना; एकाच दोरीने शेतकरी दाम्पत्याने संपवले आयुष्य, गावात शोककळा

Published : Jul 25, 2025, 11:39 AM IST
Buldhana News

सार

बुलढाण्यात एका शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीने गळफास लावून आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. यामागील नक्की कारण स्पष्ट झालेले नाही. 

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असतानाच बुलढाण्यातील एक घटना मन सुन्न करणारी ठरली आहे. चिखली तालुक्यातील भरोसा गावात एका शेतकरी दाम्पत्याने एकाच दोरीने गळफास लावून आयुष्य संपवल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पेरणीचा हंगाम सुरू असतानाच शेतकऱ्यांकडून त्यांचे आयुष्य संपवल्याच्या घटना पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या असून, या घटनेने कृषी संकटाचे गांभीर्य अधोरेखित केले आहे.

मृत्यू झालेल्या दाम्पत्याची नावे गणेश थुट्टे (वय ५५) आणि रंजना थुट्टे अशी आहेत. दोघांनीही आपल्या घराजवळ असलेल्या लिंबाच्या झाडाला एकाच दोरीने गळफास लावून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दाम्पत्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी शेतीतील सततचं नुकसान आणि हुमणी अळीचा प्रादुर्भाव यामुळे ते मानसिक तणावात होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आर्थिक अडचणी आणि शेती संकटामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दोघांचे मृतदेह झाडावरून उतरवून शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस अधिक तपास करत असून, यामागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

या हृदयद्रावक घटनेनंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस मदत आणि धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. थुट्टे दाम्पत्याच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! 'जिवंत सातबारा मोहीम' म्हणजे काय? तुमची अडचण कायमची कशी दूर होईल, पाहा!
नाताळात कन्फर्म तिकीट हवंय? कोकण रेल्वेची खास भेट!, 'या' विशेष गाड्यांचं संपूर्ण वेळापत्रक पाहा!