
Maharashtra Politics : भाजपच्या ध्येय-धोरणांविरोधात सातत्याने भूमिका घेतल्याच्या आरोपावरून भाजप बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक रोहन देशपांडे यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीतही ताण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.या बद्दलचे वृत्त महाराष्ट्र टाइम्स यांनी दिले आहे.
भाजपने अनेक वेळा समज देऊनही रोहन देशपांडे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात जाहीर प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर भाजपने खुलासे करूनही देशपांडे यांनी वारंवार भाजपविरोधी भूमिका घेतली. केंद्र आणि प्रदेश नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांवर त्यांनी उघडपणे टीका केल्याने पक्षाने ही शिस्तभंगाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
डावे पक्ष, मनसे, काँग्रेस तसेच उबाठा गटाच्या नेत्यांसोबत आंदोलनात सहभागी होत भाजपची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप रोहन देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ते भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत की भाजपविरोधी पक्षांचे, असा प्रश्न निर्माण झाला होता, असे भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत महायुतीसाठी प्रयत्न झाले, मात्र भाजपच्या सर्वंकष सत्ताकेंद्रित भूमिकेमुळे शिवसेनेने पुण्यात स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे शिवसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रचाराच्या समारोपानंतर उदय सामंत यांनी मतदारांना खुले पत्र लिहून भाजपच्या कार्यपद्धतीवर अप्रत्यक्ष टीका केली. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेची भूमिका निर्णायक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुणे महापालिका निवडणुकीत मतदारांना पैशांचे आमिष दाखवून आणि उमेदवारांना धमक्या देऊन दबावाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केला. अशा प्रकरणांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.