
मराठा आरक्षणावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगण्याची शक्यता आहे. भुजबळांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंवर कठोर शब्दांत टीका करत मराठा समाजाच्या नुकसानाला त्यांना जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर छगन भुजबळांनी समाधान व्यक्त केलं. “माझी नाराजी आता संपली आहे. आमचं आरक्षण आम्हाला पुन्हा बहाल झालं आहे. हा आठ कोटी ओबीसी जनतेसाठी आनंदाचा क्षण आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी न्यायालयाच्या निकालामुळे निर्माण झालेला आनंद उघडपणे व्यक्त केला आणि सांगितलं की, यामध्ये कोणालाही नाराज होण्याचं कारण नाही.
भुजबळांनी मराठा आरक्षणाबाबतही स्पष्ट मत व्यक्त केलं. “मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण देण्यात आलं आहे. फडणवीस सरकारने हे आरक्षण मान्य केलं आहे. त्यामुळे मराठा समाजाने आपलं आरक्षण सांभाळावं आणि त्याचा लाभ घ्यावा,” असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर भटक्या-विमुक्त व इतर मागासवर्गीयांचा हक्कही जपण्याचं आवाहन त्यांनी केलं.
आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर निर्णय घेताना योग्य अभ्यास गरजेचा आहे, असं सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे मनोज जरांगेंवर टीका केली. “अनेक वेळा आरक्षण म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट आणि आयोगांचे काय निर्णय आहेत, राज्याची सामाजिक रचना काय आहे. याचा अभ्यास नसलेल्या लोकांकडून गैरसमज पसरवले जातात,” असा टोला त्यांनी लगावला.
भुजबळांनी काही नेत्यांवर गंभीर आरोप करत सांगितलं की, “काही लोक ओबीसी सर्टिफिकेटवर फायदा घेतात, पण ते ओबीसी समाजासाठी लढत नाहीत. त्यांनी ओबीसी जागा मिळवून पुन्हा त्याच ओबीसी समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे,” असा आरोप करत त्यांनी डावपेच उघड केला.
भुजबळांनी मनोज जरांगेंवर थेट हल्ला चढवत म्हटलं, “जरांगेंनी प्रत्येक गावात वातावरण बिघडवलं. मराठा समाजाचं मोठं नुकसान झालं, पण दुसरं काही साध्य झालं नाही.” या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ निर्माण झाली असून आगामी काळात वाद अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. या वक्तव्याला मनोज जरांगेंकडून काय प्रत्युत्तर मिळेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.