
मुंबई : श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भाविकांच्या सोयीसाठी विशेष नियोजन केले असून, दर्शनासाठी वेगवेगळ्या रांगा, वाहनतळ, क्यूआर कोड आणि ऑनलाईन सुविधांचा समावेश करण्यात येणार आहे.
प्रशासन सज्ज; जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली भीमाशंकर यात्रेच्या नियोजनाबाबत एक आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिर समितीचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर समितीला अधिकृत संकेतस्थळ स्थापन करून भाविकांना ऑनलाईन सेवा देण्याच्या सूचना दिल्या.
दर्शनासाठी दोन रांगा
श्रावणात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डुडी यांनी दर्शनासाठी दोन वेगवेगळ्या रांगा तयार करण्याचे निर्देश दिले. एक व्ही.आय.पी. दर्शन रांग असून दुसरी साध्या भाविकांसाठी असेल. तसेच, दर्शन आणि पूजेचे टप्पे स्पष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे.
वाहनतळ, क्यूआर कोड आणि सुविधा यांचे नियोजन
पोलीस विभागाने वाहनतळ निश्चित करून त्याठिकाणी चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले. वन विभागाने रस्त्यातील अडथळे दूर करण्यासाठी सर्व्हे करावा, जेणेकरून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही.
तसेच, मंदिर परिसर, भीमाशंकर गाव आणि मंचर येथे क्यूआर कोड दर्शवणारे फलक लावण्याचे निर्देशही दिले गेले. या क्यूआर कोडद्वारे भाविकांना व्ही.आय.पी. दर्शन आणि मंदिर संस्थानकडून दिल्या जाणाऱ्या सेवा मिळवण्यास मदत होणार आहे.
रविवारपर्यंत कामे पूर्ण करण्याचे निर्देश
सर्व विभागांनी येत्या रविवारपर्यंत ही कामे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. श्रावणात येणाऱ्या हजारो भाविकांची सोय आणि सुरळीत दर्शन हेच प्रमुख उद्दिष्ट आहे, आणि त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.